चारवेळा मोजणी नोटीस येऊनही शेतकऱ्यांच्या शेताच्या मोजणीस टाळाटाळ

0
30

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

धानोरा येथील शेतकरी श्रीकांत दयाराम नरवाडे या शेतकऱ्याने आपल्या शेताच्या मोजणीसाठी दुसऱ्यांदा मोजणी फी भरूनही त्याच्या शेताची मोजणी होत नसल्याने व हेतू पुरस्कारपणे मोजणी अधिकारी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे गुरुवारी, १६ मे रोजी नांदुरा पंचायत समितीच्या उपसभापती योगिता गावंडे आणि पत्रकार संदीप गावंडे यांनी शेतकरी यांच्यासह भूमी अभिलेख कार्यालयाला भेट दिली. यावेळी उपअधीक्षक हेमंत किन्हिकर अनुपस्थित होते.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताची मोजणीचे काम मार्गी लागावे, याकरीता भूमी अभिलेख कार्यालय नांदुराचे उपअधीक्षक हेमंत किन्हिकर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शेतकरी श्रीकांत दयाराम नरवाडे याने दुसऱ्यांदा मोजणी फी भरल्यानंतर त्यांना आतापर्यंत भूमी अभिलेख कार्यालयाकडून तब्बल चार वेळा मोजणी नोटीस मिळाल्या आहेत. त्यापैकी शेवटच्या नोटीसवर १६ मे २०२४ रोजी त्यांची मोजणी असल्याचे त्यांना कळविण्यात आले होते. परंतु शेतात वाट पाहूनही मोजणी अधिकाऱ्याचा पत्ता नसल्याने त्यांनी मोजणी अधिकारी यांना फोन केला. तेव्हा त्यांनी ‘आज माझी बुलढाणा मीटिंग आहे’ असे कारण त्यांना सांगितले. आतापर्यंत तब्बल चारवेळा मोजणी नोटीस येऊनही शेतकऱ्याची शेताची मोजणी झालेली नाही. शिवाय प्रत्येक वेळेस शेतकऱ्याने स्वतः मोजणी अधिकाऱ्यास फोन केलेले आहेत. मोजणी अधिकारी यांनी एकदाही शेतकऱ्यास मोजणी जमत नाही, शेतात थांबू नका, असा साधा निरोपही कधीच दिला नाही. त्यामुळे मोजणीच्या प्रत्येक तारखेस शेतकरी पुरते हैराण झालेले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ मोजणीच्या आशेवर ठेवणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालय उप अधीक्षक हेमंत किन्हीकर यांना खुलासा विचारण्यासाठी उपसभापती योगिता गावंडे यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता नांदुरा येथील भूमी अभिलेख कार्यालय गाठले. तेव्हा तिथे उपअधीक्षक हेमंत किन्हीकर हे गैरहजर आढळून आले. तसेच त्यांच्या कार्यालयास कुलूप आढळून आले.

त्यामुळे कार्यालय अधीक्षक शेळके यांना विचारणा केल्यावर किन्हीकर कधी येतील, हे माहित नाही, असे उत्तर मिळाले. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेताचा मोजणीचा प्रश्‍न मार्गी लागत नाही, तोपर्यंत उपअधीक्षक हेमंत किन्हीकर यांच्या कार्यालयासमोर उपसभापती योगिता गावंडे, पत्रकार संदीप गावंडे आणि शेतकरी श्रीकांत दयाराम नरवाडे यांनी ठिय्या दिला आहे. अशा प्रकारे तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचे मोजणीचे प्रश्‍न प्रलंबित असल्याची माहिती कार्यालयात उपस्थित इतर शेतकऱ्यांकडून मिळाली आहे. पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकऱ्यांचे शेत मोजणीचे प्रश्‍न भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ मार्गी लावावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपसभापती योगिता गावंडे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here