साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
हापूस आंब्याचा हंगाम सध्या जोमात आहे. अक्षय तृतीयेला आंब्याचे मोठे महत्त्व असते. आंब्याचे या सणापासून प्राधान्याने महत्त्व वाढत जाते. मागीलवर्षी हवामानाच्या संकटामुळे आंब्याची आवक तुलनेने कमी होती. यंदाचे चित्र मात्र समाधानकारक आहे. शुक्रवारी, १० मे रोजी अक्षय तृतीया असल्याने त्यानिमित्त पाचोरा शहरात आंब्याच्या विक्रीसाठी बाजारपेठ फुलली आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया सणापासून आंब्याला मागणी वाढत जाते. पाचोरा शहरात आंब्याचा प्रचंड बाजार फुललेला दिसत आहे. पाचोरा शहरात रत्नागिरी, देवगड, कोकण व परराज्यातून आंब्याची मोठी आवक झालेली आहे. पाचोरा शहरासह तालुक्यातील नागरिकांनी आंबा खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.
हापूस आंब्याचे दर टप्प्याटप्प्याने २०० ते १५० रुपयांपासून त्यात जास्तीत जास्त ४०० ते ५०० रुपयांपर्यंत आहे. आंब्याच्या पेट्या या प्रमाणात खरेदी केली जात आहे. साधारण अक्षय तृतीयेच्या एक दिवस आधीच गरिबी ग्राहक आंबा खरेदी करतात. सुट्ट्यांचा हंगाम असल्याने गर्दीही वाढली आहे. हापूस आंब्याचे दुकानदार यांनी सांगितले की, यावर्षी आंब्याचे दर मागच्या वर्षापेक्षा दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. हापूस आंब्याच्या छोट्या बॉक्सला मागणी शहरातील मध्यवर्तीय कुटुंबांचा लहान आकार पाहून रत्नागिरीतून आंबा पाचोरा शहरातील विक्री होत आहे.
हापूस आंबा विक्रेते गणेश शिंदे म्हणाले की, चार ते पाच डझनची पेटी बाराशे ते पंधराशे रुपयांना दिली जात आहे. बहुतांश जण देवगड हापूस आंबा या नावाने खोके छापून आणि चढ्या भावाने विक्री करतात. त्यांना जर कमी भावाच्या पेटीबद्दल विचारले असता तर ते नकली हापूस आंबा असल्याचे सांगतात. झाडाला आलेला आंबा हा ओरिजनल आणि नकली कसा येईल, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण प्रिंट केलेल्या बॉक्समध्ये देवगड नावाच्या आंब्याची चढ्या भावाने विक्री करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करायची असते. आता अक्षय तृतीयापासून तर महिनाभर आंब्याची खरेदी विक्री सुरू होईल. त्याची उलाढाल जवळपास दोन ते तीन कोटीच्या आसपास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.