साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
कोण टीका करणार आहे, कोण चुका करणार आहे त्यांना परमेश्वर बघेल… ‘आधली भरलेली आहे त्याला शिगरी लावा’ आ.चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्र्यांचे विनंती वजा आदेश दिलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप मिळाल्याने गुरुवारी, ९ मे रोजी सकाळी साडेबारा वाजेच्या सुमारास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगर येथे आ.चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बाहेर निघा, असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले.
रावेर लोकसभा मतदारसंघात खा.रक्षाताई खडसे महायुतीच्या उमेदवार असताना शिवसेनेच्या विशेषता शिंदे गटाच्या आ.चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभाग घेण्यात यावा, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अचानक मुक्ताईनगरचा सकाळी दौरा करत कार्यकर्त्यांसह आ.चंद्रकांत पाटील यांच्याशी हितगुज केले. निवडणूक प्रचार यंत्रणेत जोमाने कामाला लागण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी मुक्ताईनगर येथील शिवसैनिकांच्या बैठकीत आणि पत्रकार परिषदेत केले.
पालकमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा आपल्याला फोन आला. त्यानुसार आपण शिवसैनिकांची मनधरणी करण्यासाठी याठिकाणी आलेलो आहे. पक्षाचा आदेश असून हा सर्वांना मान्य करावा लागेल. त्यानुसार सर्वांनी आता प्रचाराला लागले पाहिजे. भारतीय जनता पक्ष पुढे विधानसभेत आपले काम करेल किंवा नाही याची साक्षंकता व्यक्त करत आता तरी पक्षाचा आदेश मानत कामाला लागा, असा सल्ला त्यांनी दिला. खासदार कोण होणार यापेक्षा देशाचा नेता कोण आहे याकडे बघण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत जेलमध्ये जाऊन आलेले असल्याने त्यांना जेलचे स्वप्न पडतात. म्हणून ते मुख्यमंत्री शिंदे यांना जेलमध्ये जाण्याची भाषा करतात, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच महायुतीचे उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना साधा मतदार म्हणून आतापर्यंत संपर्क साधलेला नाही, असे विचारल्यावर आमदारांची नाराजी दूर झालेली आहे, असे उत्तर देत रक्षा खडसे शुक्रवारी आ.पाटील यांच्याकडे भेट देणार आहे, असे सांगितले.
आ.चंद्रकांत पाटील यांना गुरुवारी सकाळी पालकमंत्री यांचा फोन आला होता. आपणासह कार्यकर्त्यांशी चर्चा करायची आहे, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री आमचे आधारवड आहेत, ते सांगतील ती दिशा पूर्व असेल. तसेच पक्षाचा आदेश मान्य असेल. नुकतेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्याकडे येत भेट घेत आपण पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. यासाठी समोरच्यांनी पण विश्वासात घेतले पाहिजे, असा मार्मिक टोलाही आ.पाटील यांनी लगावला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, बोदवडचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, बोदवडचे तालुकाप्रमुख प्रमोद धामोडे, मुक्ताईनगर तालुका प्रमुख नवनीत पाटील, युवा जिल्हाप्रमुख पंकज राणे, रिपाईचे तालुकाध्यक्ष सुधाकर बोदडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, नगरसेवक संतोष मराठे, संतोष कोळी, आरिफ आजाद, निलेश शिरसाठ, गोपाळ सोनवणे, नूर मोहम्मद खान, प्रफुल्ल पाटील, गणेश टोंगे, स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.