पाळधीला तब्बल ४५ वर्षांनी माजी विद्यार्थी शाळेत आले एकत्र

0
53

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

येथील स.नं.झवर विद्यालयातील १९७८-७९ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ४५ वर्षांनी स्नेह मेळावा नुकताच मोठ्या आनंदात पार पडला. मेळाव्यात माजी शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते. काही विद्यार्थी तर बंगलोर, पुणे, नाशिक, बुऱ्हाणपूर येथून येऊन उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शिक्षक अशोक सोनवणे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत माजी शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, माजी विद्यार्थी तसेच परिवारातील स्वर्गीय व्यक्ती यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

स्नेहमेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलन, सरस्वती पूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविकातून माजी विद्यार्थी प्रकाश फुलझाडे, मदन पाटील, गुलाब पाटील यांनी कार्यक्रम आयोजनाची भूमिका विशद केली. त्यानंतर गुरुजनांना कृतज्ञता सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या माजी शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली. त्यात रामदास परदेशी, बालकिसन सोमाणी, अशोक सोनार, प्रभाकर चौधरी, एम.एस.बिर्ला, जी. आर.पंडित, शिक्षकेतर सहकारी भीमराव कुंभार, गोकुळ सूर्यवंशी यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. प्रयोगशाळा सहायक प्रभाकर महाजन यांनी कवितेतून गुरु-शिष्य नात्याचे दर्शन घडविले.

आनंदाश्रुनी डोळे भरून आले…!

स्नेहमेळाव्यात अशोक सोनवणे यांनी मनोगतातून गुरु- शिष्य नाते संबंध, विद्यार्थ्यांबद्दल असलेले प्रेम, शालेय जीवनातील आठवणी तसेच विद्यार्थ्यांनी मिळविलेला समाजातील नावलौकिक पाहून आनंद व्यक्त केला. यानंतर स्नेह मेळाव्यात आलेल्या विद्यार्थी एकमेकांचे बदललेले चेहरे, राहणीमान आणि बोलीभाषा यांची निरीक्षण करत तब्बल ४५ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या बालपणीतील आठवणीनीं अनेकांचे डोळे आनंदाश्रुनी भरून आले. शाळेतील माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले, कुणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी तर कुणी नोकरी व व्यवसायात सक्रिय झाले. त्या काळात मोबाईल अथवा फोन अशी सोय नव्हती. त्यामुळे नंतर कोण कुठे स्थायिक झाले याची अनेक वर्गमित्रांना माहिती नव्हती. पण मैत्रीचे नाते आणि शाळेची आठवण प्रत्येकाला येत होती. त्यातूनच गुलाब पाटील, मदन पाटील आणि प्रकाश फुलझाडे यांनी नियोजन करून स्नेह मेळावा आयोजित केला.

मनोगतातून जोपासला मैत्रीभाव

कार्यक्रमात सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शालेय आठवणींना उजाळा देत आपल्या मनोगतातून मैत्रीभाव जोपासला. गुरु शिष्य -नाते याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केला. तसेच सर्वांनीच आता वयाची साठी गाठली होती. त्यामुळे सर्व मित्र-मैत्रिणींना एकमेकांनी सुखी जीवन जगण्याचा कानमंत्र दिला. यानंतर ज्ञानमंदिर परिसराचा आनंद घेत वंदे मातरम राष्ट्रीय गीताने स्नेह मेळाव्याचा समारोप झाला. कार्यक्रमास माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी कुटुंबासह उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी नथ्थू ठाकरे, अशपाक देशपांडे, पंडीत मोरे, जयंत जोशी, विलास जुनागडे, युनूस शेख, प्रमोद झवर, रतीलाल पाटील, पंढरीनाथ साळुंखे, छाया कलंत्री, इंदिरा मणियार, मंगला भुतडा, सरला जाधव, लता रायसिंग, कैलाश मालपाणी, हर्षल फुलझाडे, डी. एन. जाधव, मुकेश ठाकूर यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार प्रा.दीपक पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here