साईमत, यावल : प्रतिनिधी
यावल-चितोडा रस्त्यावर चितोडा गावाकडे जाणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीचे सुसाट वेगात धावणारे डंपर उलटल्याची घटना रविवारी, ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नसली तरी घटनास्थळी डंपरचे दोन तुकडे झाले होते. अवैध वाळू वाहतुकीचे डंपर उलटल्याचे वृत्त यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई करण्याचे आदेश यावल पोलिसांसह महसूल विभागाला दिले.
अवैध वाळू डंपरची घटना घडता बरोबर यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पुढील कारवाई केल्यामुळे यावल महसूलच्या तिजोरीत मोठी आर्थिक भर आर्थिक वर्ष अखेर पडली. जिवीतहानी झाली नसली तरी डंपर मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे चर्चिले जात आहे. याबाबत तहसिलदारांच्या आदेशान्वये यावल पोलीस स्टेशनला डंपर चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणात महसूल विभागामार्फत अवैध वाळू वाहतूक उघड झाल्याने वाहन मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले.
यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात गौण खनिज वाहतूक करणारे अवैध व रितसर परवाना काढून गौण खनिजाची वाहतूक करणारे डंपर हे रस्त्याच्या परिस्थितीकडे व सार्वजनिक वाहतुकीकडे आणि रस्त्याने वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांकडे मोटर सायकल चालकांकडे नागरिकांकडे दुर्लक्ष करीत सुसाट वेगाने आपली वाहने चालवित असतात. त्यामुळे ठिकठिकाणी अपघात होऊन जीवितहानी होत आहे. काही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामुळे पोलीस आणि महसूल विभागाने आपापल्या कार्यक्षेत्रात गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, डंपर मालकांची वाहन चालकांची बैठक घेऊन वाहने मर्यादित वेगात चालविण्याबाबत तसेच माती, गाळ आदी गौण खनिजाची वाहतूक करताना त्यावर ताडपत्री, फट बांधण्याची अट सक्तीची करावी, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.