साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कुलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘सुवर्णयुग माझ्या शिवबाचे’ महानाट्याचे आयोजन केले होते. त्यात तब्बल १७५ कलाकारांनी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सव्वा तासभर चाललेल्या यशस्वी महानाट्यात रसिकांची मने जिंकून घेतली. नाटिका संपन्न झाल्यावर संपूर्ण प्रसारमाध्यम, युट्युब, व्हॉट्सॲप, फेसबुक यावर प्रसारण झाल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव झाला. भविष्यात असे नाटक पाचोऱ्याच्या इतिहासात रचले गेले त्याचा सार्थ अभिमान पाचोराकरांना झाला. याबद्दल संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
महानाट्यासाठी ज्यांची मूळ संकल्पना होती ते संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी मनोगतात पालक व विद्यार्थी यांचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केलेली कला रसिकांना भावली आहे. विद्यार्थ्यांकडून भविष्यात अपेक्षा व्यक्त करुन त्यांचा गौरव केला. आमची संस्था ही अशा विविध चांगल्या कार्यक्रमांना नेहमीच प्रोत्साहित करत असते, याबद्दल त्यांनी विद्यालयाचे कौतुक केले. महानाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन शाळेतील शिक्षक महेश कोंडिण्य यांचे विशेष कौतुक करत सत्कार करण्यात आला.
महानाट्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचाही गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष व्ही.टी. जोशी, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षक आर.एल.पाटील, ए.बी.अहिरे, अंजली गोहिल, ज्येष्ठ लिपिक अजय सिनकर, तांत्रिक विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, आकाश वाघ उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक महेश कोंडीण्य तर आभार आर.बी. बोरसे यांनी मानले.