सातपुड्यात ‘जलसंकट’ ओढावले : पाण्याची पातळी खालावली

0
35

साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर

धानोरा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे. संपूर्ण सातपुडा पर्वतावरील शेती शिवार आणि गावांवर ‘जलसंकट’ ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत. धानोरा परिसर तसा शेती, समुध्दीने नटलेला आहे. या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. त्यामुळे विहिरी या टप्पा करीत असून संपूर्ण परिसरात ‘जलसंकट’ आल्याचे नजरेस पडत आहे. शेतकरी पिके वाचविण्यासाठी अहोरात्र धडपड करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हांचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. त्याची झळ शेती शिवारातील पिकांनाही तेवढ्याच उष्णतेने जाणवत आहे तर शेतातील विहिरींची पातळीही खोल जात असल्याचे सद्यस्थितीला चित्र दिसत आहे.

धानोरा परिसरातील देवगाव, पारगाव, बिडगाव, मोहरद, कुंड्यापाणी, चांदण्या तलाव, वरगव्हाण या शेती शिवाराला फायदेशिर ठरणारे धरण आहेत. मात्र, त्यांच्यात अल्प पाणीसाठा असल्याने तसेच धरणांची उर्वरित कामे अपूर्ण राहिल्याने त्यांचा काही एक उपयोग झालेला नसल्याचे नजरेस पडत आहे. परिसराला वरदान ठरणारे चिंचपाणी धरणाचे काम आजही अपूर्णावस्थेत असल्याने विधानसभा निवडणुकीच्या वेळेलाच धरणाची राजकीय पुढाऱ्यांना आठवण होते. तेही असे ‘स्वप्न अपुरे चिंचपाणी धरणाचे, आम्ही पूर्ण करू तयाचे’ एवढीच गोष्ट त्यांना आठवते. तेवढ्यापुरता धरणाची कामे केली जातात.

धानोरा परिसराला भविष्याच्या दुष्टीने पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी चिंचपाणी धरण वगळता कोणतेही धरण नाही. त्यामुळे चिंचपाणी धरणाचे उर्वरित राहिलेले काम होणे अत्यावश्‍यक आहे. एप्रिल महिन्यातच तापमानाने चाळीशीच्यावर मजल मारली आहे. अद्याप ‘मे हिटचा’ तडाखा बाकी आहे. चोपडा, यावल, रावेर हे तालुके केळीसाठी प्रसिध्द आहे. केळी पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड या भागात केली जाते. याच महिन्यात केळी बागा उन्हामुळे करपु लागल्या आहे. केळीचे घड काळी पडत आहेत तर शेतकरी मिळेल त्या साधनाने त्यावर आच्छादन घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तापमानाचा वाढता पारा

धानोरासह परिसरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वेगाने चढत असल्याने ‘मे’ महिन्यासारखा उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत आहे. धानोरासह परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सकाळी दहा वाजेपासूनच रस्त्यावरची वर्दळ कमी होऊन रस्ते ओस पडत आहेत. तसेच परिसरात ‘मे’ महिन्यातील होणारी तीव्रता पाहून शेतकरी, शेतमजूर, सालदार आपल्या खरीपपूर्व पेरणीच्या शेती मशागतीची कामे शक्यतो सकाळी उरकून घेताना दिसत आहे. ‘मे’ महिना लागला की, शेतकऱ्यांची शेती कामांना सुरुवात होते. पण मार्च महिन्यातच कडक उन्हामुळे तापमानात भर पडत आहे. तर ‘मे’ महिन्याचे काय? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. भारनियमनामुळे दुपारी विजेवर चालणारे पंखे, फ्रीज, कुलर शोपीस म्हणून घरात दिसत आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर, सूर्याचे वाढत असलेले अग्नीतांडव, सतत खालावत जाणारी पाण्याची पातळी आणि भारनियमनाचा फटका त्यामुळे शेतकरी पूर्ण अडकला आहे. केळी बागा जगून कर्ज फिटणार का वाढणार? त्याच चिंतेत बळीराजा दिसत आहे.

केळीच्या भावालाही फटका

सध्या केळीचे भाव स्थिर असले तरी केळी कापणीमध्ये व्यापारी बोर्ड भावापेक्षा दोनशे ते तीनशे रुपये कमी दराने केळीची मागणी करत असल्याने एकप्रकारे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले जात आहे.रात्रंदिवस एक करून केळी बागांना शेतकरी पाणी देऊन बागा वाचवत असूनही भावाच्या फरकामुळेही शेतकऱ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे वाढत्या तापमानाचा फटका, घटत असलेली पाण्याची पातळी, त्याचबरोबर शासनाचे वेळ काढू कर्जमाफीचे धोरण यामुळे शेतकरी पुरता बुडाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांंचे जगणे कठीण झाले आहे.

केळी बागेसह इतर पिकांनाही फटका

अद्याप ‘मे’ महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु आहे. त्यात दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ आणि ह्या वाढीचा फटका शेती शिवारातील केळी बागासह इतर पिकांनाही बसत आहे तर बळीराजा ह्या उन्हांपासून पिकांच्या संरक्षणाकरीता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने नदी, नाले, कोरडेठाक पडले आहे. त्याचा परिणाम शेती शिवारातील कुपनलिका, विहिरींच्या पाणी पातळीवर झालेला दिसून येत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here