साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर
जामनेर तालुक्यातील नांद्रा येथील प्रगतीशील शेतकरी दिवाकर पाटील यांच्या शेतात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत गाव पातळीवर शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माती पुजनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी विकासोचे व्हा.चेअरमन धनसिंग पाटील होते.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी सुभाष अहिरे यांनी नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. रासायनिक शेतीतील उत्पादित शेतमालाचे शरीरावर होणारे अपाय तसेच राज्य पुरस्कृत कापूस उत्पादकता वाढ व मुल्य साखळी अभियान ह्या विषयावर माहिती दिली. संग्रामसिंग राजपूत यांनी एस.आर.टी. तंत्रज्ञान, नैसर्गिक पद्धतीनुसार करावयाची शेती पध्दत तसेच जीवामृत-बिजामृत तयार करणे आणि महत्त्व विशद केले. त्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. डॉ. संदीप पाटील यांनी पशुधनातील व नैसर्गिक शेतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या गाईचे संगोपन आणि महत्त्व विषयावर माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक जी.पी.पाटील यांनी कृषीविषयक शासनाच्या योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन केले.
संवादातून तंत्रज्ञानाविषयी जाणून घेतली माहिती
कार्यक्रमानंतर एस.आर.टी.पध्दतीने लागवड केलेल्या पीक प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांनी भेट दिली. दिवाकर पाटील यांच्यासोबत संवादातून तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाला ललीत राजपूत, जामनेर तालुक्यातील गाडेगाव, रोटवद आणि मोहाडी येथील शेतकरी, नांद्रा येथील शेतकरी गटातील महिला सदस्य, विकासोचे चेअरमन धनसिंग पाटील, अविनाश वाघ, भरत बोरसे, पाणी फाउंडेशनचे तुषार तायवाडे, मंगेश चव्हाण, नंदकिशोर पाटील, दीपक पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दिवाकर पाटील, सुत्रसंचालन डॉ. संदीप पाटील तर आभार कृषी सहाय्यक आर.जी.निकम यांनी मानले.