साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, अनिष्ट रूढी, परंपरेचा अवलंब करून आपणच आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करतो आहे. त्यामुळे आगामी काळात संस्कृतीचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी संतांनी समाजासाठी प्रबोधन करावे, असा ठराव देवगिरी प्रांत मराठवाडा व खान्देश मिळून १६ जिल्ह्यातून आलेल्या २५० संत-महंतांनी केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवगिरी प्रांत यांच्या पुढाकाराने निसर्गरम्य अशा श्री निष्कलंक धाम, वढोदा (फैजपूर) येथे दोन दिवसीय झालेल्या संत संमेलनात अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, अखिल भारतीय संत समितीचे राज्याध्यक्ष प.पू. गोपाल चैतन्यजी महाराज, रा.स्व. संघ पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, धर्म जागरण पश्चिम क्षेत्र प्रमुख महेंद्र रायचुरा, प्रांत प्रमुख सिद्धेश्वरजी बिराजदार, धर्म जागरण संस्थेचे योगी दत्तानाथ शिंदखेडा, महानुभाव पंथाचे गादीपती सुरेशशास्त्री मानेकर बाबा, श्री क्षेत्र डोंगरदे येथील स्वरूपानंदजी महाराज, प. पू. दिगंबर महाराज शिवाचार्य वसमत, श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे श्याम चैतन्य महाराज यांनी सकारात्मक समाज प्रबोधन विषयांतर्गत चार विभागात बैठक घेऊन पाच चर्चासत्रात विविध विषयांवर चर्चा करून त्यावर पुढील काळात संतांनी समाज प्रबोधन करावे, असे ठरले.
चर्चासत्रात धार्मिक सण, उत्सवात विविध देवतांच्या मूर्तीची विटंबना, लहानांपासून मोठ्यापर्यंत डीजेच्या आवाजाने होणारे परिणाम, असंख्य प्रमाणात होत असलेली व्यसनाधिनता, फिल्मी गीतांवर अयोग्य पद्धतीने नाचणे, लग्नकार्य समारंभात प्री-विडिंग प्रथा तसेच समाजातील विक्षिप्तपणा थांबविण्यासाठी संतांनी समाजाचे प्रबोधन करून आपली धार्मिक संस्कृती परंपरेची जोपासना करावी. सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे. आपापल्या परिसरातील असलेल्या मंदिरांची पवित्रता जोपासून दररोज मंदिरात जाणे. पर्यावरण, व्यसनमुक्ती, ग्राम स्वच्छतेसाठी संतांनी प्रबोधन करावे. भगवान श्रीराम स्वतः वनवासातील शबरीमाता, केवट, निशाद यांच्यासारख्या अनेक वनवासी बांधवांकडे जाऊन त्यांना प्रेम देतात. त्याच पद्धतीने संतांनी अशा समाज, जनजातीतील सर्वांकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या अडीअडचणी जाणून त्यांच्या मदतीसाठी यथायोग्य प्रयत्न करावे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
संत संमेलनाला देवगिरी प्रांतातील १६ जिल्ह्यांमधून संत, महंत, कथाकार, कीर्तनकार, पुजारी, प्रवचनकार, भगत यांच्यासह राष्ट्रीय संघाचे कार्यकर्ते, धर्म जागरण तथा सतपंथ परिवातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.