साईमत, चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यात २६ फेब्रुवारी रोजी बेमोसमी पाऊस पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात गारपीट व वादळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये मका, ज्वारी, हरभरा, केळी, दादर व गहू असे काढणीवर आलेल्या पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी, अशा आशयाचे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन नायब तहसीलदार आर. आर. महाजन यांनी स्वीकारले.
तालुक्यात २६ रोजी रात्री अचानक वादळ व गारपीटसह पाऊस आल्याने तालुक्यातील ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तयार झालेली पिके जमीनदोस्त झाली असल्याने त्यांच्या पुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेती करण्याकामी लागलेला खर्चही निघणार नाही, अशी विवंचना झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक चव्हाण, पं.स.चे माजी सभापती डी. पी. साळुंखे, शांताराम सपकाळे, तुकाराम पाटील, सुनील डोंगर पाटील, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भाऊसाहेब साळुंखे, युवक जिल्हा सरचिटणीस लहुश न्हायदे, दीपक वानखेडे, विशाल गवळी, शेखर पाटील, मच्छिंद्र पाटील, अमोल पाटील, भाईदास पाटील, इंद्रजीत पाटील, युवक शहराध्यक्ष समाधान माळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.