साईमत, लोहारा, ता. पाचोरा : वार्ताहर
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील त्या काळी असलेल्या न्यू इंग्लिश स्कुल, लोहारा (आताच्या डॉ.जे.जी. पंडित मा. वि., लोहारा) विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३४ वर्षांनी लोहारा येथील पवित्र तीर्थक्षेत्र श्री तपेश्वर महाराज मंदिराजवळ नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी १९९१ वर्षातील दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी ३४ वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्व मित्र, मैत्रिणी, गुरुवर्य भाऊक झाल्याचे दिसून आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक भीमराव शेळके होते.
स्नेहमेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी व मित्र-मैत्रिणींनी शाळेतील गुरुजनांबाबत कृतज्ञता व्यक्त करत स्वतःचा परिचय करून मनोगत व्यक्त केली. यावेळी अ.अ.पटेल, इ.एन.सावदेकर, जी.एल. सरोदे, वाय.बी.पाटील, एम.के.बाविस्कर, जी.बी.पाटील, श्री.धनगर, श्री.असवाल, काशिनाथ चौधरी, श्री.द्राक्षे, श्रीमती चौधरी, श्री.सुर्वे, श्रीमती शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून करण्यात आली. तसेच स्व.गुरुजन आणि वर्गमित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित सर्व शिक्षकांचे शाल, श्रीफळ, रुमाल टोपी, दहा ग्रॅम चांदीचे नाणे देऊन सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच डॉ.जे.जे.पंडित माध्यमिक विद्यालयाला डिजिटल बॅनर भेट स्वरूपात देण्यात आले.
यावेळी गुरुजनांच्यावतीने उपस्थित सावदेकर, पटेल, वाय.बी.पाटील, धनगर, काशिनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे जीवन प्रफुल्लित होणे हाच आमचा सत्कार आहे, असे सांगून उपक्रमाचे कौतुक केले. तसेच नाशिक येथील नाईन प्लस हॉस्पिटलचे संचालक डॉ.राजेंद्र देशमुख (इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट) यांनी सर्व शिक्षकांना नाशिक येथील प्रसिद्ध द्राक्षे भेट म्हणून दिली.
आदर्श शिक्षक अर्जुन भोई यांनीही मनोगतात श्री तपेश्वराकडे एकच मागणी केली की, आम्हा गुरुवर्य व मित्र-मैत्रिणींना सर्वांना सुखी व समृद्ध ठेव आणि लोहारा मातीचे नाव संपूर्ण जगात गाजु दे कारण या तपेश्वराने आमचे लहानपण, आमची गरिबी, जुने दिवस बघितले आहेत. आमची आजची भेट ही खरच अविस्मरणीय असेल, असे सांगितले. दहावीच्या १९९१ बॅचचे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, यशस्वी उद्योजक, प्रगतशील शेतकरी, इतर विविध पदावर कार्यरत आहे. त्यांच्या भेटीने खूप आनंद झाला, असे मान्यवरांनी आवर्जून सांगितले.
यशस्वीतेसाठी रवींद्र चौधरी, किशोर कुमावत, भगवान हटकर, रामकृष्ण माळी, भगवान खरे, भरत कोळी, अर्जुन भोई, ज्ञानेश्वर पाटील, भरत सोनार, रवींद्र भोई, राजेंद्र हटकर, पवन पाटील, नंदकिशोर पाटील, प्रवीण पालीवाल, विलास भदाणे, रवींद्र जाधव, हीतेंद्र सुपे, विश्वास ठोसर, आनंदा ढेकळे, कल्पना चौधरी, अनिता ललवानी, संगीता अंबिकार, चंदा परदेशी, शोभा चौधरी, सुनंदा सोनी, रत्नाबाई जगताप, प्रतिभा शिंपी, सरला विसपुते, वैशाली चौधरी, वंदना निकम, अनिता चौधरी, बेबाबाई सरोदे, लीलाबाई माळी, उज्ज्वल पालीवाल, सुधाकर विसपुते, संतोष गुजर, संदीप चौधरी, विलास पालीवाल, भारत सोनार, वसंत सरोदे, रवींद्र सूर्यवंशी, अरुणा कासार, डॉ.राजेंद्र देशमुख, पवन पाटील, शैलेश पाटील, नरेंद्र पालीवाल, संजय लिंगायत, राजू धोबी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र देशमुख तर आभार विलास पालीवाल यांनी मानले.