सोनपोत लांबविणाऱ्या दोघांना अकोल्यातून घेतले ताब्यात

0
17

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

शहरातील संताजीनगरमधील रहिवासी महिलेच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीची सात ग्रॅम वजनाची सोनपोत दोन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवर येत लांबविल्याची घटना गेल्या १३ जानेवारी २०२४ रोजी घडली होती. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात १४ जानेवारी रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी तपास चक्रे फिरवून अकोला येथून दोघांना अटक केली. दरम्यान, दोन्ही आरोपींकडून मुक्ताईनगर आणि भुसावळ येथे दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे.

सविस्तर असे की, गेल्या १३ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील संताजीनगरमधील प्रज्ञा प्रदीप तळेले यांच्या घराच्या समोरुन त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची ७ ग्रॅम वजनाची मनी मंगळसुत्राची व त्यात काळे मनी व सोन्याचे मनी असलेली पोत व त्यात मंगळसुत्राचे २ शिंपले सोन्याचे अशा वर्णनाची व किंमतीची पोत दोन अनोळखींनी त्यांच्या ताब्यातील लाल रंगाची मोटार सायकलवर येऊन प्रज्ञा तळेले यांच्या गळ्यातील सोनसाखळी पोत लबाडीच्या इराद्याने चोरुन नेली होती. याप्रकरणी तळेले यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून संजय ब्रिजमोहन चौकशे (रा.तिल्लोर खुर्द, ता.जि.इंदोर, मध्यप्रदेश) आणि शंकर फुलचंद भरोदिया (रा.छोटी नदी पनधना रोड, खंडवा, ह.मु. किनखेड पूर्णा, ता.अकोट जि.अकोला) यांना सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अकोला यांच्याकडून ताब्यात घेऊन गुन्ह्याकामी अटक केली आहे.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक महेश्‍वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पो.ना. मोतीलाल बोरसे, पो.ना. निलेश श्रीनाथ, पो.अं. गजानन जाधव, विशाल पाटील यांनी आरोपींकडून भुसावळ येथे दाखल गुन्ह्यातील आणि मुक्ताईनगर येथील गुन्ह्यातील असे १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ३४.५४० ग्रॅम वजनाचे पिवळ्या धातुचे (सोन्याचे) ३ तुकडे आरोपीतांनी काढून देऊन ते गुन्ह्याकामी जप्त केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here