साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
शहरातील सर्वात जुनी आणि पहिली कॉलनी असलेले विद्यानगरात ठिकठिकाणी असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कॉलनीत हाकेच्या अंतरावर नगरपालिका, प्रांत कार्यालय, डीवायएसपी कार्यालय आहे. याकडे नगरपालिका अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचा संताप होत आहे. स्वच्छता अभियानाचा देखावा केला जात असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच नगरपालिका ‘केराची टोपली’ दाखवत असल्याने नागरिकांचा संताप होत आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टरला समस्या सांगूनही काम होत नसल्याने जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
अलीकडे सर्व प्रकारचे कर भरण्यासाठी नागरिकांना सक्त ताकीद दिली जाते. विद्यानगरमधील रहिवाशांची शंभर टक्के कर वसुली आहे. तरीही नागरिकांच्या प्राथमिक पायाभूत सोयी सुविधांकडेच दुर्लक्ष केले जाते. विद्यानगरमधील हनुमान मंदिरासमोर पाण्याच्या टाकीखाली गेल्या अनेक महिन्यांपासून गटारीचे पाणी साचलेले आहे. येथील गटारी प्लास्टिक, काडी कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे घराघरातील संडास, बाथरूमचे पाणी तिथेच साचले जाते. त्यामुळे दुर्गंधी, डास व किड्यांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते.
गेल्या दोन महिन्यांपासून गटार साफ करण्यासाठी सफाई कामगार आलेले नाहीत. दारोदारी साचलेला कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर येत नाही, अशी परिस्थिती असल्याचे नागरिकांनी सांगितले. काम न करता लाखोंची बिले मात्र खर्ची टाकली जात असल्याचा आरोप होत आहे. प्रभारी अधिकारी असल्याने नगरपालिकाच आजारी पडल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.