साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
येथील नगरपंचायतीमार्फत नागरिकांनी सुका कचरा आणि ओला कचरा घंटागाडीत विलगीकरण करून टाकावा, अशा आशयाच्या पत्रकाचे वाटप करुन बक्षीस स्वरूपात ‘पैठणी साडी मिळवा’ असा शक्कल लढविणारा उपक्रम राबविला जात आहे. मात्र, दुसरीकडे नगरपंचायत नागरिकांच्या भावनांशी खेळ का खेळत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गावातील कचरा जमा करताना दोन प्रकारात नागरिकांकडून संकलित केला जातो. परंतु हा कचरा गाडीत एकत्र होऊन डम्पिंग ग्राउंडलाही एकत्रच खाली केला जात असल्याचे चित्र आहे. त्यात कुठलाच प्रकारचा विलगीकरणचा भाग नसून केवळ नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार नगरपंचायतीच्या प्रशासनाकडून केला जात आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष नाही का? कचरा विलगीकरणाच्या नावाखाली नुसती बॅनरबाजी करून मोठा गाजावाजा केला जात आहे. त्यामुळे नगरपंचायतीचे अधिकारी करतात तरी काय? असाही प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे सुज्ञ नागरिक तर्कवितर्क लावत आहे.
मुक्ताईनगर शहरात नगरपंचायतमार्फत घंटागाड्या प्रत्येक प्रभागात घरातील रोजचा कचरा गोळा संकलनासाठी फिरत असतात. अशातच नगरपंचायतीने शक्कल लढवून नवीनच उपक्रम बक्षीस वितरणाचा राबविला आहे. घंटागाडीत नागरिकांनी घरातील सुका आणि ओला कचरा गोळा करून विलगीकरण करून घंटागाडीत सुका कचऱ्याच्या कप्प्यात आणि ओला कचऱ्याच्या कप्प्यात वेगवेगळा करून टाकावा. त्यानंतर घंटागाडी चालकामार्फत एक कुपन नागरिकांना देण्यात येत आहे. परंतु घंटागाडीत विलगीकरणसाठी कप्पे नसून बऱ्याच गाड्यांमध्ये एकच कप्पा गाडीत बनविला आहे. वरतून फक्त दोन प्रकारचे त्या कप्प्याला खिडक्या दिलेल्या आहे. एका साईडमध्ये सुका कचरा लिहिलेला असून दुसऱ्या साईडमध्ये ओला कचरा असा उल्लेख केला आहे. परंतु यामध्ये नागरिकांना नगरपंचायतमार्फत मूर्ख बनविले जात आहे, असा प्रश्न जाणकारांमधून उपस्थित होत आहे.
बुऱ्हाणपूर रस्त्यावरील स्मशानभूमी शेजारी आणि मागील असलेले डम्पिंग ग्राउंडवरती नगरपंचायतमार्फत कचऱ्यांचा ढीगचा ढिग कचऱ्याचा लागला आहे. यामध्ये कुठल्याच प्रकारची कचऱ्याची विलगीकरणाची व्यवस्था नाही. सुका कचरा, ओला कचरा, काचेच्या बाटल्या, तुकडे, प्लास्टिकच्या वस्तू, प्लास्टिकच्या पिशव्या, काडी कचरा, मेलेले ढोर, दवाखान्यातील स्लाईनच्या बाटल्या, नळ्या, इंजेक्शन असा बऱ्याच प्रकारचा कचरा एकत्र समाविष्ट करण्यात येतो. त्यातून नगरपंचायतीला कुठलाच फायदा होत नाही.
नगर पंचायत कचऱ्यातून लाखो रुपयांच्या वस्तू, प्लास्टिक, लोखंड, खत विकू शकते. परंतु नगरपंचायत लाखो रुपये का बुडवित आहे, असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे. अशा प्रकारचे विलगीकरण नसल्यामुळे त्याठिकाणी आजूबाजूंचे रहिवासी, शेतकरी वर्ग यांना डम्पिंग ग्राउंडमुळे भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांंचे कापूस, तूर, गहू अशा प्रकारच्या अन्नधान्याचे लाखोंच्या घरात नुकसान होत आहे. ही नुकसान भरपाई नगरपंचायतमार्फत शेतकरी लोकांना मिळणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित आहे. तो डम्पिंग ग्राउंडचा कचरा जवळच असलेल्या बॅक वॉटरमध्ये समाविष्ट होऊन मुक्ताईनगरवासियांना तेच पाणी नगरपंचायत पिण्यासाठी देत आहे. यामुळे नागरिकांच्या भावनाही दुखावल्या जात आहे.
डम्पिंग ग्राउंडवरील कचरा लहान मुले पाच दहा रुपयांसाठी त्यातली भंगार जमा करून भंगारवाल्यांना विकत आहे. त्यातच त्या लहान चिमुकल्यांना जर पत्रा, तार, अथवा ब्लेड, काचेचे तुकडे त्यांच्या शरीराला कमी जास्त लागले तर हॉस्पिटलची झुंज त्या लहान मुलांना द्यावी लागेल. त्यातूनच त्यांना अपंगत्वही येऊ शकते. डम्पिंग ग्राउंडवर बऱ्याच वेळा आग लावलेली दिसते. त्या चिमुकल्या मुलांचे अंगही भाजू शकते. त्यामुळे त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्नही उपस्थित होत आहे.