साईमत, जामनेर : प्रतिनिधी
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू असतांना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले आहे. आंदोलनाला वाढत चाललेला पाठिंबा बघता महाराष्ट्र शासनाने २७ जानेवारी रोजी रात्री तीन वाजता नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तसेच त्यांच्या सगे सोयरे यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले. कोणताही दगा फटका न करण्याचा व न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण दिल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री मंडळातील त्यांचे सहकारी गिरीश महाजन आणि दीपक केसरकर यांच्या साक्षीने दिला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेऊन विजयी गुलाल उधळण्याचे जाहीर केले. याबद्दल जामनेरात सकल मराठा समाजाच्यावतीने एकच जल्लोष करण्यात आला.
सर्वप्रथम नगर परिषदमधील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रदीप गायके, चंद्रकांत बाविस्कर, शंकर मराठे, दिलीप खोडपे, डॉ.प्रशांत भोंडे, डॉ.प्रशांत पाटील, विश्वजीत पाटील, व्ही.पी.पाटील, उल्हास पाटील, भूषण पांढरे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्या मराठा तरुणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले, त्यांना आरक्षण विजयाचे श्रेय दिले. तसेच मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज बांधवांनी एकजुटीचे दर्शन घडवून आंदोलन यशस्वी केले, त्या सर्व समाज बांधवांना दिले. तसेच याबाबत महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त करतानाच आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत कसे टिकेल, यासाठी शासनाने प्रयत्न करावे, अशी विनंतीही करण्यात आली.
यावेळी माधव चव्हाण, समाधान वाघ, सागर पाटील, भूषण पाटील, अमोल पाटील, किरण पाटील, अशोक पाटील, रुपेश पाटील, राजु चौधरी, नरेंद्र जंजाळ, जीवन सपकाळ, आकाश बंडे, रवी बंडे, अविनाश बोरसे यांच्यासह हजारो मराठा समाज बांधव उपस्थित होते.