साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथील पी.टी.सी. संचलित श्री. गो.से.हायस्कुल शाळेच्या दर्शनी फलकावर प्रभु ‘श्रीराम’ अवतरले आहे. तब्बल ५०० वर्षानंतर २२ जानेवारी २०२४ ह्या मंगल दिनी रामलल्ला आपल्या मुलस्थानी म्हणजेच अयोध्या नगरीत भव्य अश्या, मनमोहक मंदिरात विराजमान झाले आहे. त्यानिमित्त भारतात सर्वदूर आनंदी वातावरण आहे. सर्वांसाठी हा दिवस सर्वात मोठा सण आहे. त्याच मोठ्या सणाचे औचित्य साधून श्री. गो.से.हायस्कुलचे कलाशिक्षक सुबोध मुरलीधर कांतायन यांनी शाळेच्या फलकावर प्रभु ‘श्रीराम’ खडूच्या माध्यमातून चित्र काढले आहे.
चित्राचे बारीक निरीक्षण केल्यास त्यात विविध चित्रण आपल्याला दिसून येते. त्यापैकी पहिले म्हणजे चित्रात दोन रामाच्या कलाकृती साकारल्या आहेत. त्यात असे दाखवायचे आहे की, डाव्या बाजूला असलेले राम वनवासातील राम आहेत. आजूबाजूला झाडी दाखवली आहे आणि ते ५०० वर्षानंतर आपल्याला जन्मस्थानी अयोध्या त्या वास्तूत जातांना पाहत आहेत. राम सेतू अजूनही अस्तित्वात आहे. तो सरळ भव्य अश्या राममंदिरापर्यंत दाखविला आहे. श्रीराम येणार पण सोबत सीता आणि लक्ष्मण पण येणार. म्हणून श्रीरामासोबत डाव्या बाजूला सीता यांचे पाऊल गुलाबी रंगात तर उजव्या बाजूला लक्ष्मण यांचे पाऊल नारंगी पिवळ्या रंगात दाखविल्याचे दिसत आहे. तसेच ‘मेरे राम आये है’ असा ठळक उल्लेखही चित्राच्या मध्यभागी केल्याचे स्पष्ट दिसत आहे.