साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
‘निर्भय बनो’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी, २१ जानेवारी रोजी हजारो नागरिक महालपुरे मंगल कार्यालय येथे ‘निर्भय बनो आंदोलन’ बॅनर खाली एकत्र जमले होते. त्यात अनेक मान्यवर, पत्रकार, सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. हजारो नागरिकांनी लोकशाही, संविधानाच्या रक्षणासाठी शपथ घेतली. देशातील दमणकारी मोदी सरकारविरोधात ‘निर्भय बनो’ आंदोलनाची सुरुवात केल्याचे पत्रकार गणेश शिंदे यांनी भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकारची हमी अश्या हुकूमशाही पदतीने जाहिरात दाखविणाऱ्या वाहनाला विरोध केला होता. त्यांनी घेतलेल्या आक्षेपावर अनेक बहुजन, व्यापारी, अधिकारी, विविध राजकीय नेते यांनी दखल घेतली. ‘निर्भय बनो’ यासाठी प्रागतिक नागरी समिती, क्षत्रिय ग्रुप, महापुरुष सन्मान समिती, पाचोरा समविचारी व मित्र मंडळ यांनी सभा आयोजित केली होती. यावेळी संविधानाचे व कायद्याचे अभ्यासक भाष्यकार ॲड.असिम सरोदे, सामाजिक व पर्यावरणवादी डॉ.विश्वंभर चौधरी यांच्या हस्ते दैनिक ‘साईमत’चे प्रतिनिधी गणेश शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
‘निर्भय बनो’ म्हणजे आम्ही स्वतंत्र भारताच्या लोकशाही राज्यातील जबाबदार नागरिक, धर्म, जात, वंश, लिंग, प्रांत, भाषा या सर्व भेदा पलीकडे जाऊन व्यक्तींचे स्वतंत्र अबाधित राखणाऱ्या भारतीय संविधानाचे रक्षण आणि पालन करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही देशातील संविधानिक मूल्याचा, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, बंधुता आणि सांस्कृतिक आदर करतो. त्याचे पालन करण्यासाठी प्रसंगी संघर्ष करण्यास आम्ही तयार आहोत. आमची लढाई केवळ प्रतिकांची नाही, त्या मागील विचारांची आहे.
देशातील सध्याच्या हेतुपूर्वक चालना दिलेल्या विद्वेषी आणि हिंसक वातावरणाला थोपविण्याचे आमचे प्रयत्न राहतील. धर्मांध शक्तीचे सातत्याने लक्ष राहिलेल्या सर्व अल्पसंख्यांक समूहातील बंधू भगिनींना आम्ही हे सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाहीत. आम्ही सर्व संविधान प्रेमी नागरिक तुमच्या बरोबर आहोत. अश्या विचारावंर ‘निर्भय बनो’ आंदोलन सुरू आहे. यावेळी खलील देशमुख, धनराज पाटील, पप्पू राजपूत, विकास पाटील, प्रवीण ब्राह्मणे, अझर खान, ॲड.अभय पाटील, किशोर डोंगरे, अण्णा भोईटे, ॲड. अविनाश भालेराव, रंजित पाटील आदी उपस्थित होते.