साईमत जळगाव प्रतिनिधी
गेल्या ३ दशकातील शिक्षण व सामाजिक उद्योजकता क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुण्याच्या अजिंक्य डी. वाय. पाटील ईनोवेशन विद्यापीठातर्फे भरत अमळकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ऑनरिस कौसा (डी.लिट.) या पदवीने महराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे हस्ते विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात सन्मानीत करण्यात आले.
भरतदादा अमळकर यांच्या शिक्षण व सामाजिक उद्योजकता या दोन क्षेत्रातील ३ दशकांच्या नाविन्य व वैविध्यपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ तसेच सीव्हील ईंजीनिअर व बांधकाम व्यावसायीक असलेले भरतदादा यांना डॅाक्टरेट पदवी देण्यात आली. ते शिक्षण व सामाजिक उद्योजकता क्षेत्रात गेल्या 30 -32 वर्षापासून कार्यरत आहेत. श्रध्देय डॉ. अविनाश आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या भरतदादांनी विवेकानंद प्रतिष्ठानची स्थापना केली. छंदातून विकास आणि विकासातून आत्मविश्वास देत विवेकानंद प्रतिष्ठानचा विस्तार केला. गेल्या 15 वर्षापासून शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम करत त्यात बदल करून शिक्षणाची गुणवत्ता वाढवली आहे. यासोबतच नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यातही ते मोलाचे योगदान देत आहेत. शासनाच्या ऊच्च स्तरीय विविध समित्यांवर सदस्य म्हणून ते काम करत आहेत.
सामाजिक उद्योजकतेत भरतदादांनी गेल्या 13 वर्षांपासून केशवस्मृती सेवा समूहातील विविध 22 प्रकल्प हे आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण व कालसंगत बनविण्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. सर्व प्रकल्प आज स्वत:च्या पायावर उभे आहेत. यातून सुमारे 1100 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सेवा संस्था उभारण्यासह सेवा कार्य करणाऱ्यांची नवीपिढीही भरतदादांनी तयार करीत आहेत. दमदार सहकार्याच्या मदतीने भरतदादा सेवा संस्थांचा कार्यभार बहुमूखी प्रगतीपथावर नेत आहेत. सेवासमूहाची रोजची लाभार्थींची संख्या 10000 पेक्षा जास्त आहे. या सर्व कार्याची दखल अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाने घेत त्यांना डी.लिट. ही मानाची पदवी दिली आहे.
भरतदादा अमळकर यांना राज्याचे राज्यपाल रमेश बैस, अजिंक्य डी.वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती अजिंक्य डी.वाय. पाटील, कुलगुरू एच. देशपांडे, समन्वयक डॉ. पल्लवी पाटील व स्नातक उपस्थित होते.जळगावातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला खास ऊपस्थित होते.
या पदवीप्रदान सोहळ्यात जळगावचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते भरत अमळकर, सर्वोच्य न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ज्ञ जे. साई दिपक, प्रसिद्ध कश्मिर फाईल्स चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, केंद्र सरकाराच्या सुरक्षा विभागाचे सल्लागार दिल्ली स्थित लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांनाही डी.लिट.पदवी देवून गौरविण्यात आले.
चौकट
भरतदादांच्या मार्गदर्शनाखाली पहिले ते सातवीच्या महाराष्ट्र राज्याचा सेमी इंग्रजीचा अभ्यासक्रम राज्यात 1997साली सर्वप्रथम तयार करून त्याचा अवलंबही केला. हाच अभ्यासक्रम शासनानेही पुढे जसाच्या तसा स्विकारत तो लागु केला आहे.हे विशेष.