साईमत जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णी जिल्हा दौऱ्यावर आल्या असता अधिसूचित लोकसेवा पुरविणाऱ्या कार्यालयाचे तपासणीचा भाग म्हणून आयोगाने प्रभाग समिती क्रमांक १ चे कार्यालयाला भेट देऊन तपासणी केली. वं कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तदनंतर मनपा सभागृहात आढावा बैठक घेतली.
यावेळी कक्ष अधिकारी उदय कानव्व, सहाय्यक कक्षा अधिकारी प्रशांत घोडके यांची उपस्थिती होती. यावेळी आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी मनपाचे अधिनियमाच्या अंमलबजावणी बाबत समाधान व्यक्त करून निर्देश दिले की, लोकसेवा हक्क कायद्यातील सेवा नागरिकांना वेळेत द्यावी. या अधिनियमान्वये राज्यातील नागरिकांना पारदर्शक गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असून या कायद्याची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. प्रत्येक कार्यालयात सेवा हमी कायद्याच्या अधिसूचित सेवांची सूची दर्शनी भागावर प्रदर्शित करावी त्यात पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपील अधिकारी,अपील अधिकारी यांचे नाव निर्देशित केलेले असावेत. लोकसेवा हक्क अधिनियमानुसार सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा डॅशबोर्डवर आलेल्या अर्जांची व अपिलांची पडताळणी करावी. सेवा हमी देणाऱ्या विभागांनी प्रलंबित प्रकरणांचा तसेच अपील प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यात यावा.सेवा हमी कायद्याची नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. सेवा देणाऱ्या पदनिर्देशित अधिकाऱ्याने एखाद्या सेवेसाठी जास्त कालावधी लागत असल्यास अशा सेवेच्या मुदत वाढीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा असेही निर्देश आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले.
शासनाच्या नगरविकास विभागामार्फत सेवा हक्क कायद्याअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रकारिता अधिसूचित शेवपैकी जळगाव महानगरपालिकेत ५९ सेवा अधिसूचित केलेल्या आहेत. या सेवा जन्म मृत्यू विवाह नोंदणी, पाणी पुरवठा,मालमत्ता कर संकलन, अग्निशमन व आपत्कालीन विभाग, अभिलेख विभाग, सार्व. स्वच्छता विभाग, व प्रभाग समिती कार्यालये नगर रचना विभाग, ग्रंथालय यांचेमार्फत या सुविधा देणेत येतात. नागरिकांना विहित मुदतीत सेवा प्राप्त न झाल्यास सेवा हक्क कायद्याअंतर्गत प्रथम वं द्वितीय अपील दखल करू शकतात तसेच नाशिक येथील आयोगाचे कार्यालयात तृतीय अपील दखल करू शकतात.
यावेळी मनपा अतिरिक्त पल्लवी भागवत , उपायुक्त अविनाश गांगोडे, अभिजीत बाविस्कर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपा सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी केले. उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी मनपाचे अधिकारी व सर्व विभाग प्रमुख, सेवा पुरवणारे पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपील अधिकारी, द्वितीय अपील अधिकारी उपस्थित होते.