मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मध्य प्रदेशातून अवैधरित्या मालवाहू वाहनातून गुटखा वाहून घेऊन जात असताना मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड शिवारातील बऱ्हाणपूर चौफुलीजवळ बुधवारी, १० जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता वाहनाचा अपघात झाला होता. त्यामुळे पोलिसांना त्या वाहनातून अवैधरित्या वाहतूक होत असलेला १५ लाख ४५ हजाराचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी आठ लाख रुपये किमतीची मालवाहू गाडी आणि १५ लाख ४५ हजार रुपयांचा अवैध गुटखा असा २३ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सविस्तर असे की, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना १० जानेवारी रोजी रात्री दहा वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावाजवळ एक मालवाहू गाडी अपघातग्रस्त झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर निरीक्षक मोहिते यांनी उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, हवालदार संजीव पाटील, विजय पठार, लतीफ तडवी यांना घटनास्थळी पाठविले. अपघातग्रस्त बडा दोस्त मालवाहू गाडी (क्र.एमएच २८ बीबी ५८१३) ही रस्त्यावर पलटी झालेली दिसून आली. वाहनाची तपासणी केल्यावर पोलिसांना गाडीत मोठ्या गोण्या आढळून आल्या. गोण्यांमध्ये गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. गाडीचा चालक रमेश कडूदास तारगे (रा.लक्कडकोट, जालना) आणि सोहेल नसीर बेग (रा.रहमान गंज, जालना) यांना विचारणा केली. तेव्हा हा गुटखा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून एका जणाकडून घेतलेला आहे. डोलारखेडामार्गे मलकापुरकडे जात असताना गाडीचा कुंड गावाजवळ अपघात झाल्याचे सांगितले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनगर यांच्या फिर्यादीवरून रमेश तारगे आणि सोहेल बेग यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. वाहनाचा कोणीतरी पाठलाग करीत होते. म्हणून अपघात झाल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सांगितले. चेक पोस्ट व पूरनाड नाक्यावर मालवाहू गाडीची तपासणी झाली नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.