साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
येथील अनुलोम संस्था आणि आश्रय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी दहा वाजता पंचधातूची प्रभू श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते देऊन झाला. यावेळी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे, अनुलोम संस्थेचे तुषार महाजन, खेमचंद्र धांडे, माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन, लेफ्टनंट डॉ. आर. आर. राजपूत, संदीप भारंबे उपस्थित होते. याप्रसंगी फैजपूर, न्हावी, अंजाळे, करंजी, यावल, बोरावल, सांगवी, हिंगोणा, आमोदा येथील ९० राम भक्तांना पंचधातूची प्रभु श्रीरामाची मूर्ती देण्यात आली.
जात, समाज, श्रीमंती, गरिबी हे भेदभाव मिटून हिंदू म्हणून सर्वांनी एकत्र यावे. श्रीरामांना आपण हेच देऊ शकतो. प्रभू रामचंद्रांना आवडणारे कार्य करीत रहा, जगत रहा. त्यांनी दिलेले आदर्श, संस्कृतीचे पालन आपण करावे. माझे संपूर्ण आयुष्य धर्म समाजासाठी समर्पित आहे. ज्या कार सेवकांनी आपले बलिदान दिले. त्यांच्यासाठी आपण २२ जानेवारीला दिवा लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करा. सर्वांनी घरोघरी प्रभू रामचंद्रांची पूजन करावे, असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. कुंदन फेगडे यांनी केले.
