जिल्हा वार्षिक योजना वाढीव‌ निधी मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
73

साईमत जळगाव प्रतिनिधी

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)‌ २०२४-२५ अंतर्गतच्या नियतव्ययात जळगाव जिल्ह्यातील वाढीव निधीच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल. अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.

जिल्हा वार्षिक योजना २०२४- २५ च्या प्रारूप आराखड्याबाबत मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, पालकसचिव राजेश‌‌ कुमार आदी उपस्थित होते. नाशिक येथून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जळगाव येथून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड तसेच जिल्हा प्रशासनातील इतर सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२४-२५ साठी २२० कोटींचा वाढीव‌ निधीची मागणी केली.‌ जिल्ह्यातील अनेक लहान व मोठे प्रकल्प, योजना मार्गी लागण्यासाठी वाढीव निधीची आवश्यकता असून‌ वाढीव निधी मिळावा. अशी अपेक्षा पालकमंत्र्यांसह, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व बैठकीस उपस्थित जिल्ह्यातील आमदारांनी व्यक्त केली.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जिल्ह्यातील‌ वाढीव निधीची मागणी रास्त आहे. याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. तसेच जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढीसाठी कृषी क्षेत्रातील कामांवर भर दिला पाहिजे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाच्या पातळीवर जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी पाठपुरावा करावा. यासाठी राज्य शासनाच्या पातळीवर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) प्रारूप आराखड्यात योजनानिहाय करण्यात आलेल्या महत्त्वाच्या तरतूदी, २०२३-२४ च्या निधी‌ खर्चाचे नियोजन, मंजूरी दिलेल्या विशेष कामे, प्रकल्पांचे तसेच २०२४-२५ साठीच्या अतिरिक्त मागणीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सादरीकरण केले. जिल्हा विकास आराखड्याविषयी सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात केळी व कापूस, पशुसंवर्धन,‌ प्लास्टिक उद्योग, कापूस जिनिंग, सोने उद्योग,खाद्यतेल निर्मिती, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग या क्षेत्रामध्ये विकासाला वाव आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here