साईमत, यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील साकळी मंडळात गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० ते ९ वाजेच्या सुमारास आणि त्यानंतर म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या चक्रीवादळी पावसामुळे शेती पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. तसेच वृक्ष उन्मळून पडल्याने काही वेळ एसटी बस व इतर वाहतूकही ठप्प झाली होती. यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. शुक्रवारी, १ डिसेंबर रोजी सकाळपासून यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, मंडळ अधिकारी सचिन जगताप, मनवेल, थोरगव्हाण, साकळी येथील तलाठी वानखेडे यांच्याकडून नुकसान झालेल्या शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी सुरू करण्यात आली.
यावल तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री साकळी मंडळात ३६.५ मी.मी., किनगाव ३९.९., यावल ८२, बामणोद १५.३, फैजपूर ४ मी.मी.चक्रीवादळासह पाऊस झाला. त्यात साकळी मंडळातील थोरगव्हाण-मनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर जळगाव जिल्हाधिकारी, फैजपूरचे प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १ डिसेंबर रोजी सकाळपासून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, मंडळ अधिकारी व संबंधित तलाठी यांनी थोरगव्हाण परिसरातील भागात नुकसान झालेल्या शेती पिकांची व नुकसान झालेल्या शेतांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून पुढील कारवाई सुरू केली आहे.
यावल पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील यांच्या थोरगव्हाण शिवारातील शेतातील १० हजार लागवड केलेला केळी पील बाग चक्रीवादळाने नष्ट झाला आहे. तसेच टमाटे, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली.
