साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी व प्रामाणिक अभ्यासाद्वारे स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होता येत असल्याचे प्रतिपादन यूपीएससीच्या कॅटेगिरीमध्ये प्रथम उत्तीर्ण झालेल्या शुभम मनोहर सरदार यांनी व्यक्त केले. जळगाव येथील सूर्य जीवनी अभ्यासिकाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. कमलेश तायडे होते. यावेळी ॲड. राजेश झाल्टे, सुखदेव तायडे, सामाजिक नेते मुकुंदराव सपकाळे, संस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष एस.के.केदारे, सचिव भीमराव अडकमोल आदी उपस्थित होते.
शुभम सरदार म्हणाले की, स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करताना एकाग्रता, अद्ययावत माहिती यासह सर्वांगिण विषयाचे अवलोकन यामुळे स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येते. यावेळी शुभम सरदार यांच्या हस्ते सूर्यजिवनी अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. अभ्यासिकेत विविध स्पर्धा परीक्षांसाठी दालन खुले केले आहे. दालनात १०० विद्यार्थी-विद्यार्थिनीची बैठक व्यवस्था केली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी सांगितले.