साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथील नाचणखेडा रस्त्यावरील शिवाजी ओंकार धनगर यांच्या शेतात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत महिला शेती दिनानिमित्त नुकताच कार्यक्रम साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी एस.एस.वळवी, कार्यालयीन कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाला पहुरच्या मंडळ कृषी अधिकारी कु. निता घाडगे, कृषी पर्यवेक्षक किशोर पाटील, कृषी सहाय्यक के.पी. महाजन, पी.पी.पवार, एस.ए. गायकवाड, पंचायत समितीच्या माजी सभापती नीता कमलाकर पाटील, पाळधीच्या पोलीस पाटील वैशाली प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज नेवे, बचत गटातील महिला, सी.आर.पी.महिला, इतर महिला भगिनी यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते.
महिला शेती दिनानिमित्त शेताचे मालक योगेश शिवाजी धनगर यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन नीता पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मनोज नेवे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात महिलांचे योगदान ज्या क्षेत्रात आहे. त्या क्षेत्रातील महिलांना प्राथमिक स्वरूपात कुठेतरी महिलांचा सन्मान व्हायला पाहिजे, ही भावना मनात ठेवून जामनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने पाळधी येथील दहा महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी कु. निता घाडगे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी सर्व महिलांसह शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले.