साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील साई नवदुर्गा मित्र मंडळातर्फे नुकत्याच पार पडलेल्या नृत्य स्पर्धेत हर्षाली बनकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने लोहारा येथील साई नवदुर्गा मित्र मंडळातर्फे स्तुत्य उपक्रम राबविला. स्पर्धेत २५ मुला-मुलींनी सहभाग नोंदविला. सानिध्या खरे हिने ‘भीम’ गीतावर नृत्य सादर करून द्वितीय क्रमांक पटकाविला. आचल माळी व ग्रुप यांनी ‘एकली एकली नाचोरे’ गीतावर तृतीय क्रमांक पटकाविला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील लहान मुले, महिला, वयोवृद्ध, गावातील नागरिकांनी गर्दी केली होती.
यशस्वीतेसाठी साई नवदुर्गा मित्र मंडळाचे अध्यक्ष राजू कोळी, पवन खाटीक, नितीन माळी, अतिक कोळी, नितीन कोळी, गजानन भिवसने, यांच्यासह सदस्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील, गजानन क्षीरसागर यांनी केले.