साईमत, सोयगाव : प्रतिनिधी
शस्त्रासह दरोडा घालण्याच्या उद्देशाने चारचाकी वाहनाने जाणाऱ्या सात दरोडेखोरांना सोयगाव पोलिसांच्या रात्र गस्तीवरील पथकांनी रविवारी रात्री एक वाजेच्या दरम्यान शहरातील शिवाजी चौकात रंगेहाथ पकडले. मात्र, त्यापैकी सहा दरोडेखोर अंधाराचा फायदा घेवून फरार झाले आहे. वाहनातून पंचवीस हजार रुपये किंमतीची लाकडी ग्रीप असलेल्या लोखंडी धातूच्या गावठी कट्ट्यासह दहा हजार रुपये किंमतीच्या दोन तलवारी आणि दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल तसेच महिंद्रा बोलेरो वाहन दहा लाख रुपये असा दहा लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून एकास अटक केली आहे.
सविस्तर असे की, सोयगाव शहरातील शिवाजी महाराज चौकात रात्रीच्या गस्तीवरील पोलीस पथकाला रविवारी, १५ रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास एक चारचाकी वाहन फर्दापूरकडून सोयगाव शहरात येतांना आढळून आले. या वाहनाला (क्र.एम एच-४७, ए-३२०८) हटकले असता त्याची तपासणी केली. वाहनातील एका सीट खाली दोन पाईप आढळून आल्यावर चौकशी केली. त्या वाहनातील बसलेल्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावल्याने वाहनाची कसून चौकशी केली. पोलीस शिपाई सिंघम यांना दुसऱ्या एका सीटखाली पिवळी मूठ असलेल्या दोन तलवारी अंधाऱ्यात चमकल्याने आढळल्या. त्यांनी तातडीने गस्तीवरील सर्वच पोलिसांना प्रसंगावधान राखून आरडाओरडा करून वाहनांच्या जवळ बोलावले. वाहनाची कसून झाडाझडती घेतली. त्यामध्ये दहा हजार रुपये किंमतीची दोन ७१ सेमी लांबीच्या दोन तलवारी, गावठी कट्टा अंदाजे किंमत पंचवीस हजार रुपये एक मोबाईल असा ऐवज वाहनात आढळून येताच वाहनांच्या खाली उतरलेल्या सहा जणांनी अंधाराचा फायदा घेवून घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, त्यातील एकाला घट्ट पकडून ठेवले. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने त्याचे नाव शुभम बाळासाहेब भालेराव (वय २५, रा.सफ्रॉन पार्क, पडेगाव छत्रपती संभाजीनगर, ह.मु. देवगाव रंगारी) असे सांगितले. त्याची चौकशी केल्यावर त्याने पळून गेलेल्यांची इसमांची नावे देवा गांगुर्डे (रा.अंबड, जि.जालना), संभाजी हिवाळे, प्रकाश नाईक (रा.शेंदुर्णी, ता.जामनेर), गोरख मोरे (रा.पाचोरा, जि.जळगाव) आणि इतर दोन अनोळखी इसम असल्याचे त्याने सांगितले.
घटनास्थळावरून फरारी सहा दरोडेखोरांचा पोलीस पथकांनी पहाटे पाच वाजेपर्यंत शोध मोहीम घेतली ते आढळून न आल्याने अटक करण्यात आलेला वाहन चालक शुभम बाळासाहेब भालेराव यास पहाटे सहा वाजता सोयगाव पोलीस ठाण्यात आणून अटक केली. वाहनात गावठी कट्ट्यासह दोन तलवारी व लालतिखट भरून ठेवलेली पुडी एक दोर अशा संशयित वस्तूही आढळून आल्यामुळे हे सातही दरोडेखोर इच्छित स्थळी दरोडा घालण्यासाठी जात असल्याचा संशय पोलिसांचा बळावला आहे. त्यामुळे सात जणांविरुद्ध रविवारी दहा वाजता सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील सहा जण घटनास्थळावरून फरार झाले आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी सोयगाव पोलीस ठाण्याचे विशेष पथक स्थापन केले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनमोल केदार, जमादार राजू बरडे, अजय कोळी, नारायण जिरी, रवींद्र तायडे, नारायण खोडे, अजय कोळी, विनायक सोनवणे, चालक मिर्झा बेग, संजय सिंगल, गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांनी केली.