साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर
गणेशोत्सव संपल्यानंतर सर्वांना नवरात्रीचे वेध लागतात. नवरात्रीत ठिकठिकाणी गरबा, दांडियाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाळधी येथे जीपीएस सार्वजनिक मित्र मंडळ आणि प्रतापराव पाटील मित्र परिवार यांच्यातर्फे सुमारे तीनशे महिला व तरुणींना गरबा, दांडियाचे प्रशिक्षण देण्यात आले. ४ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रशिक्षण देण्यात आले.
१५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर झालेल्या प्रशिक्षणात महिला व तरुण-तरुणींचा ओढा अधिक दिसून आला. गरबा किंवा दांडिया खरं तर गुजरात, राजस्थानमधील लोकप्रिय व पारंपरिक नृत्यप्रकार आहे. पण नवरात्रीत महाराष्ट्रातील विविध शहरात व आता ग्रामीण भागातही त्याचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. पारंपरिक गरबा खेळण्यात आपण मागे पडू नये व आत्मविश्वास वाढावा, यासाठी सर्वच वयोगटातील नागरिकांचा प्रशिक्षण घेण्याकडे कल होता. ‘ढोलिडा… ढोलिडा ढोल रे वघाड…म्हारो इच लेवीचे, इच लेवी चे रे म्हारो, गरबो झूम उठे…’ यांसह गरब्याच्या हिंदी, गुजराथी गीतांवर महिलांनी गरबा केला. महिलांना प्रशिक्षक निखिल जोशी यांनी विविध प्रकारच्या गरबा, दांडिया व छकडीचे धडे दिले.