साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकांच्या वाढीसाठी सरदार कंपनीचे रासायनिक खतांचा वापर केला होता. परंतु खतामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या घटनेला तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांनी जळगाव जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.
सविस्तर असे की, जामनेर तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीला कपाशी पिकाला सरदार कंपनीचे खत दिल्यामुळे मोयखेड्यासह गावांमधील शेतकऱ्यांचे शेतातील पीक वाया गेले होते. त्या घटनेला तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे. आजतागायत कोणत्याही प्रकारे संबंधित सरदार कंपनी आणि त्यांच्या डीलरवर कायदेशीर कारवाई झालेली नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शासनस्तरावरील अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिले. मात्र, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे काय, त्यांना मदत केव्हा मिळणार, या प्रतीक्षेत शेतकरी आहे. आता शेतकऱ्यांची न्याय हक्क व मदत मिळवून देण्यासाठी सरदार कंपनी व डीलरवर कायदेशीर तक्रार दाखल करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे वकील ॲड.ज्ञानेश्वर बोरसे हे शेतकऱ्यांसाठी कोर्टात याचिका दाखल करणार आहे.