साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
गेल्या काही दिवसांपासून येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत ‘वर्ग ७ अन् १ शिक्षक’ अशी सद्यस्थिती आहे. शाळेची पटसंख्या १११ आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे येत्या आठवड्याभरात शिक्षक न मिळाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीसह पालकवर्गाने दिला आहे.
येथील बस स्टँड परिसरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहे. त्यात १११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, चालू शैक्षणिक वर्षापासून शाळेला मोहम्मद वसीम शेख हे एकमेव शिक्षक आहे. त्यांच्यावर मुख्याध्यापक पदाचीही जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे शैक्षणिक ज्ञानदान, कार्यालयीन कामकाज व बीएलओचीही जबाबदारी असल्याने मोहम्मद शेख यांच्यावर विद्यार्थ्यांना शिकविणे व कार्यालयीन कामकाज करणे या दोघांमध्ये गोंधळ होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
त्यामुळे जळगाव जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी त्वरित जि.प.उर्दू शाळेला किमान तीन ते चार शिक्षक द्यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख रईस शेख गफ्फार यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अजमल खान समीउल्ला खान, अश्फाक खान साबीर खान, सुभान शेख सत्तार, जमील शेख फकरुला, रईस शेख अजीज नवाज, सलीम शेख सत्तार, फिरोज खान छोटे खान, ग्रामपंचायत सदस्य शेख हसन साहेबलाल यांनी केली आहे.



