साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील सामनेर येथील ५० वर्षीय शेतकरी शेतातून घरी येत असतांना त्यांना विषारी सर्पाने दंश केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, त्यांच्या अकस्मात निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
सविस्तर असे की, पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील शेतकरी संजय लक्ष्मण साळुंखे (वय ५०) हे ३ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतात पिक पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान ९ वाजेच्या सुमारास संजय साळुंखे हे घरी येत असताना त्यांना रस्त्यात एका विषारी जातीच्या सर्पाने दंश केला. घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच संजय साळुंखे यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजय साळुंखे यांना मृत घोषित केले. संजय साळुंखे अतिशय शांत स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे करीत आहे.