साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जामनेर तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचा खेळाडू प्रितेश ईश्वर सोनवणे याने डेरवण, रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत १४ वर्षाआतील वयोगटात कीडस भालाफेक प्रकारात ३०.१० मीटर भालाफेक करीत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. याबद्दल प्रितेशचा जामनेर तालुका ॲथलेटिक्स असो.चे सचिव जी.सी.पाटील यांच्या हस्ते शाल, बुके, पेढा भरवून नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रितेशचे आई-वडील, आशाबाई ईश्वर सोनवणे, वाडीचे विलास पाटील, जामनेर तालुका ॲथलेटिक्स असो.चे उपाध्यक्ष दीपक चौधरी, कोषाध्यक्ष व्ही.एन.पाटील, सहसचिव प्रा.समीर घोडेस्वार आदी उपस्थित होते.
यशाबद्दल जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. नारायण खडके, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असो.चे संचालक तथा जिल्हा ॲथलेटिक्सचे सचिव राजेश जाधव यांनी कौतुक केले आहे.