साईमत फैजपूर प्रतिनिधी
माजी खासदार तथा आमदार कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे हे अखंड पणे शेवटच्या श्वासापर्यंत शेती, माती, पाणी आणि शेतकऱ्यांसाठी कार्यरत होते. त्यांचे संस्कार, विचार आणि कार्य चिरंतन ठेवण्याच्या जाणिवेतून त्यांच्या ७० व्या जयंतीच्या निमित्ताने कृषिमित्र स्व.हरिभाऊ जावळे मित्र परिवाराच्या वतीने केळी उत्पादक आणि केळी निर्यातीसाठी इच्छुक उद्योन्मुख उद्योजकांसाठी केळी पीक परिसवांदाचे आयोजन फैजपूर येथे करण्यात आलेले आहे.
सध्या केळी निर्यातीला जागतिक स्तरावर खूप चांगला वाव दिसत आहे, परंतु केळीवर करपा, पिटींग रोग व सीएमव्ही सारखे संकट हि वाढत आहे. सोबतच वातावरण बदलाचा परिणाम जाणवत आहे. सातत्याने भेडसावणाऱ्या या अडचणी संदर्भात शास्त्रोक्त पद्धतीने चर्चा करून केळीला शाश्वत ठेवण्यासाठी या परिसवंदाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे.
परिसंवाद दिनांक ३ ऑक्टोबर रोजी, सकाळी ८ ते १२ या वेळेत, सुमंगल लॉन, एच.पी.पेट्रोल पंपा जवळ, यावल रोड, फैजपूर येथे होणार आहे. परिसवांदाचे उदघाटन जळगावचे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद आणि पाच शेतकरी प्रतिनिधी यांच्या हस्ते होणार आहे.
या परिसवांदासाठी जागतिक स्तरावर काम करीत असलेल्या तज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. यात आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ् व जैन इरिगेशन सि.लि. जळगावचे उपाध्यक्ष डॉ.के.बी.पाटील हे ‘’केळीचे अन्न द्रव्य आणि ,करपा, पिटिंग व सिएमवी रोगाचे व्यवस्थापन’’ या विषयावर तर प्रसिद्ध केळी निर्यातदार व के.डी.एक्सपोर्टचे संचालक किरण ढोके हे ‘’केळी उत्पादक ते यशस्वी केळी निर्यातदार प्रवास’’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. केळी निर्यातदार बलरामसिंग सोळंके ‘’केळी निर्यात साठी नोंदणी प्रमाण पत्र, आयात निर्यात प्रक्रिया, बँक हमी,आणि जागतिक व्यापार’’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.