पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांना मदत करणार

0
35

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

संपूर्ण जिल्ह्याभरात शनिवारी, २३ रोजी रात्री मुसळधार पाऊस झाला. परिणामी घरांमध्ये व शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. ज्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे, अशा कुटुंबियांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिले आहे. मुसळधार पाऊस झाल्याने त्यांनी रविवारी, २४ रोजी सकाळी तालुक्यातील गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

त्यात फुलपाट, आव्हानी, टहाकळी, धार, शेरी, अंजनविहिरे, खामखेडे, पथराड बुद्रुक, खुर्द, दोनगाव बुद्रुक, दोनगाव खुर्द, मुसळी या गावांना भेटी दिल्या. पाळधी गावात पाणी साचलेले होते. नाल्यात अडकलेले कचरा, झाडेझुडपे काढण्यासाठी त्वरित जेसीबी पाठविण्यात आले. जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत झाली. तसेच शेतीचे व ज्या घरांचे नुकसान झाले आहे. अशा ठिकाणी त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नुसती पाहणी न करता लोकांसोबत खांद्याला खांदा लावून प्रतापराव पाटील यांनी शेतकऱ्यांना मदत केली. दुसरीकडे पाळधी गावात दुकानांमध्ये व पोलीस ठाण्यात पाणी शिरल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here