साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी
माजी मंत्री तथा विद्यमान आ.जयकुमार रावळ यांच्या प्रयत्नाने २२ कोटी रुपये खर्च करून पूर्ण झालेल्या शिंदखेडा शहर पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी, १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी शिंदखेडा येथील गांधी चौकात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पर्यटन मंत्री व आमदार जयकुमार रावळ असतील.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन, माजी संरक्षण राज्यमंत्री खा.डॉ. सुभाष भामरे, माजी शिक्षण मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल, शिंदखेडा शहराच्या नगराध्यक्षा रजनी वानखेडे, माजी जि.प.उपाध्यक्ष कामराज निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.
शिंदखेडा शहराचा पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा निवडणूक कोणतीही असो प्रत्येक पक्षाच्या अग्रभागी ठरला आहे. शहराचा विस्तार पाहता शिंदखेडा शहरासाठी तापी नदीवरून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना व्हावी, अशी अनेक वर्षांपासूनची शिंदखेडाकरांची मागणी होती. माजी पर्यटन मंत्री आ.जयकुमार रावल यांनी विधानसभा निवडणुकीत पाणी योजना करण्याचे शिंदखेडाकरांना दिलेले आश्वासन पूर्ण केले. पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने होऊन योजनेचा लोकार्पण सोहळा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते १५ रोजी होत आहे. यावेळी राज्यमंत्री दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदखेडा येथील गांधी चौकात सकाळी ११ वाजता शेतकरी मेळावा आयोजित केला आहे.
मेमो रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखविणार
शुक्रवारी, सायंकाळी ५.४० मिनिटांनी सुरत-पाळधी सुरू असलेली मेमो रेल्वेची सुरत-भुसावळपर्यंत सुरू करण्याबाबत प्रवाशांची मागणी लक्षात घेता रेल्वे सुरत-भुसावळ सुरू केली आहे. त्या मेमो रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. शिंदखेडा शहर पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळाव्याला शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिंदखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रजनी वानखेडे, सभागृह नेते अनिल वानखेडे यांनी केले आहे.