साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील शेंगोळा गावात किरकोळ कारणावरून तरूणाला लाकडी दांडक्याने तर त्याच्या आई-वडिलांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे प्रवीण योगीराज दोड (वय २६) हा तरूण आपल्या आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. तो शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शेतातील इलेक्ट्रीक वायर पोलवरून टाकत असतांना गावात राहणारे अक्षय भागवत दोड, दीपक भागवत दोड आणि भागवत त्र्यंबक दोड यांनी तरूणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर तरूणाच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जखमी झालेल्या तरूणाला शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रविवारी, १० सप्टेंबर रोजी प्रवीण दोड याने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय भागवत दोड, दीपक भागवत दोड आणि भागवत त्र्यंबक दोड (रा. शेंगोळा, ता.जामनेर) यांच्याविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. प्रवीण चौधरी करीत आहे.