नाशिक ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ मध्ये भाजपला गाफील ठेवून ऐनवेळी आमचा घात केल्याचा दावा राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी कोल्हापुरातील सभेत शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवतांना.उद्धव ठाकरे यांचे सरकार संकटात सापडले तेव्हा राष्ट्रवादीच्या ५२ आमदारांनी स्वतःच्या सहीनिशी सत्तेत सहभागी होण्याचे पत्र दिले होते, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा दाखला देत गिरीश महाजन यांनी उपरोक्त दावा केला.
गिरीश महाजन म्हणाले की, २०१९ मध्ये शरद पवार यांनी दिल्लीत भाजपसोबत जवळपास ४ बैठका घेतल्या पण त्यांनी आम्हाला गाफील ठेवून ऐनवेळी आमचा घात केला.
शरद पवारांनी २०१४ ते २०१९ दरम्यान भाजपला पाठिंबा दिला होता.तुम्ही काहीच काळजी करू नका. मी तुमच्या पाठिशी आहे,असे ते म्हणाले होते.त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंंतर त्यांनी दिल्लीत भाजपच्या नेत्यांसोबत ४ बैठका केल्या. या बैठकांत सर्वकाही ठरले होते. शरद पवारांची आमच्याबरोबर चर्चा सुरू होती पण त्यांनी आम्हाला गाफील ठेवून आमचा ऐनवेळी घात केला, असे गिरीश महाजन म्हणाले.