साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा उपविभागीय कृषी अधिकारी तथा जामनेर तालुक्यातील गोरनाळे येथील रहिवासी रमेश जाधव यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मदत व पुर्नवर्सन मंत्री ना.अनिल पाटील, आ.किशोर पाटील, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंटे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते ‘कृषी वैभव रत्न’ पुरस्काराने नुकतेच पाचोऱ्यातील भडगाव रस्त्यालगतच्या शक्तीधाम येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
पाचोरा उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी जामनेर तालुक्यातील गोरनाळे येथील आपल्या शेतात विविध शेती पद्धतीचे बदलत्या हवामानास अनुकूल शेती पद्धती व पीकरचना शेतीचे मॉडेल स्वत: विकसित करुन शाश्वत शेतीसह झिरो मशागत, जैविक शेती, सेंद्रिय शेती अशा विविध १० शेती पद्धतींवर आधारीत एकाच शेती पद्धतीचे आदर्श मॉडेल विकसित केले आहे. स्वता:च्या मालकीच्या शेतावर कर्ज काढून विकसित केलेले शेत हे पूर्ण वेळ शेती करण्यासाठी प्रेरणादायी प्रकल्प नावारुपात आला. रमेश जाधव हे शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करीत आहेत. त्या योंजनेचा लाभ शेतकर्ऱ्यांपर्यंत चांगल्याप्रकारे पोहचवित आहेत. ते शेतातील उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना नवनवीन उपाययोजना, पीक प्रात्यक्षिके, शेतीशाळा, फवारणी करतांना घ्यावयाची काळजी आदीच्या माध्यमातून अनेक शेतकरी शेतीशी निगडीत अनेक व्यावसायिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. याबद्दल रमेश जाधव यांच्यावर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहेत.