साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
अवकाळी पाऊस व प्रतिकुल परिस्थितीमुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. त्यात भर म्हणजे शेतीमालाला योग्य भाव नसेल तर शेतकरी फार मेटाकुटीला येतो. यासाठी पर्यायी उपाययोजना म्हणून बाजार समितीच्या संचालकांनी शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेची सध्या प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. शेतमाल तारण कर्ज योजना प्रकर्षाने राबविण्याचा निर्णय घेतला असताना शेतकरी प्रमोद पाटील यांना शेतमाल तारण कर्ज योजनेतून ४५ हजार रुपयाचा धनादेश बाजार समितीचे सभापती कपिल पाटील, बाजार समितीचे सचिव जगदीश लोधे, सहसचिव सतिश पाटील, सूर्यकांत कदम तसेच शरद महाले यांच्या समवेत देण्यात आला. यावेळी बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बाजार समितीच्या शेतमाल तारण कर्ज योजनेत १८० दिवसांसाठी मालाच्या किमतीवर ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज वार्षिक सहा टक्के दराने दिले जाते. त्यामुळे आपला शेतीमाल सुरक्षित ठेवण्याकरीता तसेच वाढत्या बाजार भावाचा फायदा घेण्यासाठी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती कपिल पाटील उपसभापती साहेबराव राठोड, नूतन संचालक मंडळ यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत कर्जासाठी मूग, उडीद ,करडई, ज्वारी ,बाजरी, मका, सोयाबीन, सूर्यफूल, चना, भात, (धान ) गहू, वाघ्या, घेवडा (राजमा), बेदाणा, हळद, काजू बी, सुपारी या शेतमालाच्या किमतीवर ७५ टक्क्यापर्यंत कर्ज सहा महिन्यांसाठी दिले जाते.