चाळीसगाव : प्रतिनिधी
आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी जागा भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम किसन लांडे (वय५३) यास ५० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी धुळे लाच लुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे चाळीसगाव शहरातील रहिवासी आहे. त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी देण्याकरीता जळगाव येथील जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाला अर्ज केला होता. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. देवराम लांडे हे कारभार पाहत होते. नियमित भाडे सुरू करण्याच्या मोबदल्यासाठी डॉ. लांडे यांनी ५० हजाराची मागणी केली. तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान, डॉ. लांडे यांची पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी म्हणून बदली झाली होती. लाचलुचपत विभागाने कारवाईसाठी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.