साईमत, नवापूर, प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील शंभर गणित व विज्ञान शिक्षक कुप्पम येथील अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनला प्रशिक्षणासाठी ३० ऑगस्टला अहमदाबाद ते यशवंतपुरम या रेल्वेने रात्री २ वाजेला रवाना झाले. प्रशिक्षणासाठी एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच जिल्ह्यातून शिक्षक रवाना झाले ही अभिमानास्पद बाब आहे; असे प्रशिक्षण जिल्हा समन्वयक अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन यांनी सांगितले. राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर यांचे पत्रानुसार शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि अगस्त्या आंतरराष्ट्रीय फाउंडेशन यांचेमध्ये शिक्षक व प्रशिक्षकांकरिता विज्ञान विषयाच्या प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार झालेला आहे.
त्यानुसार सन २०२३ -२०२४ मध्ये विज्ञान शिक्षकांसाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन १ ते ४ सप्टेंबर या कालावधीत अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन, कुप्पम, (आंध्रप्रदेश) येथे आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शंभर शिक्षक-शिक्षिकांना २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीसाठी मुख्याध्यापकांनी कार्यमुक्त केले आहे. या कुप्पम प्रशिक्षणासाठी १३ जुलैला उद्बोधन वर्ग नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( डायट ) येथे आयोजित करण्यात आले होते. नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य डॉ. जगराम भटकर, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. रमेश चौधरी, प्रशिक्षण जिल्हा समन्वयक अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन केले होते.
प्रशिक्षणासाठी असा असेल दररोजचा गणवेश
प्रशिक्षण दरम्यान कॉमन युनिफॉर्म पहिल्या दिवशी कुर्ता-पायजमा, पैठणी साडी. दुसऱ्या दिवशी फॉर्मल ड्रेस, मोदी जॅकेट, टोपी, पंजाबी ड्रेस, तिसऱ्या दिवशी टी -शर्ट- जीन्स, चौथ्या दिवशी निळी जीन्स, पांढरे शर्ट, टाय, पांढरी साडी. रात्री जेवणानंतर सांस्कृतिक व करमणुकीच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
बेंगळुरू येथे विश्वेश्वरय्या विज्ञान केंद्र आणि बॉटनिकल गार्डन, बंगलोर शहर पाहून बंगलोर ते नंदुरबार प्रवास.तालुका प्रमुख नंदुरबार सुनील साठे, नवापूर विनायक सूर्यवंशी, अक्कलकुवा व तळोदा मेघश्याम धनगर, धडगाव धीरज हटकर, शहादा जितेंद्र पाटील, महिला पूजा रघुवंशी, स्मिता दिघे असे गट तयार केले आहेत.
नंदुरबार रेल्वे स्थानक:
नंदुरबार रेल्वे स्थानकावर रात्री ११ वाजेला शंभर गणित व विज्ञान शिक्षक कुप्पम जाण्यासाठी आले होते. सर्वांना प्रशिक्षणासाठी व प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी डायटचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. रमेश चौधरी, महेंद्र बारी उपस्थित होते. डॉ. भटकर व डॉ. चौधरी यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.