साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील श्री ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारत सरकारच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्यावतीने ‘लेटेस चेंज ‘स्वच्छता मॉनिटर उपक्रमाचा प्रारंभ जामनेर केंद्राच्या केंद्रप्रमुख संगीता पालवे, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर पाटील, एकलव्य प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास काळे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्ञानगंगा विद्यालयातील पाचवी ते आठवीच्या ५० विद्यार्थ्यांची ‘स्वच्छता मॉनिटर’ म्हणून निवड करण्यात आली. समन्वयक म्हणून विद्यालयाचे क्रीडा शिक्षक विलास पाटील यांची निवड झाली.
यावेळी प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणात चांगले काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा परिपाठात गौरव करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच जे विद्यार्थी कचरा व अस्वच्छता पसरवतील, अशा विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी ‘स्वच्छता मॉनिटर’ काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चांगले काम करणाऱ्या स्वच्छता मॉनिटर विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्यावतीने बक्षीस देऊन गौरव करण्यात येईल, असेही आव्हान केले. यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.