साईमत, साक्री (धुळे) : प्रतिनिधी
अक्कलपाडा धरणाच्या प्रकल्पांतर्गत पुनर्वसनात वडिलोपार्जित जमीन गेल्यानंतर भूमिहिन झालेल्या इच्छापूर (ता. साक्री) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना रविवारी समोर आली आहे.
इच्छापूर (ता. साक्री) येथील राजेंद्र बुगा मारनर (वय 32) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राजेंद्र मारनर यांनी रविवारी विषप्राशन करत जीवनयात्रा संपवली. त्यांच्यामागे पत्नी, मुले आहेत. त्यांचे नातलग योगेश थोरात यांच्या माहितीवरून साक्री पोलिसांत मृत्यूची नोंद झाली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर इच्छापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मारनर यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार भूमिहीन झालेले राजेंद्र मारनर दुसऱ्यांची शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
कुटुंब चालवण्यासाठी तसेच शेतीच्या कामांसाठी त्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. मात्र याच कर्जाच्या जाचातून त्यांनी रविवारी सायंकाळी विषप्राशन करत जीवनयात्रा संपविली. दरम्यान, या घटनेबाबत गावात हळहळ व्यक्त होत आहे.