साईमत, त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी
श्रावणातील पहिला सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. श्रावणी सोमवारच्या आदल्या रात्री म्हणजे रविवारी भाविकांनी त्र्यंबकेश्वरला मुक्कामी जात भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासासह ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी गर्दी केली होती. त्यानंतर सोमवारी पहाटेपासून भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शन घेण्यासाठी आणि कुशावर्त कुंडावर स्नानासाठी भाविकांची मोठी वर्दळ होती. तर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांनी पहिल्या श्रावण सोमवारी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन भगवान शंकरांच्या पिंडीचे दर्शन घेता याव्ो यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसून आले.
ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी जागोजागी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर रस्त्याच्या कडेला खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, म्हणून मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था केली आहे. दरम्यान, दुसरीकडे प्रदक्षिणा मार्गावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचे पथक तैनात केले आहे. तसेच एखाद्या भाविक आजारी पडल्यास त्याच्या मदतीसाठी आरोग्य विभागाकडून प्रदक्षिणा मार्गावर डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक यांच्या टीम तैनात केल्या आहेत. विविध सामाजिक संघटनांकडून भाविकांना पाण्याच्या बॉटल, उपवासाचे साहित्य, चहा, कॉफी यांचे वाटप केले जात आहे.