साईमत, नाशिक । प्रतिनिधी
महानगर पालिकेच्या हद्दीत अनधिकृत होर्डिंग सर्रास लावण्यात येत आहे. तसेच पंचवटी परिसरात तर त्याचा कहरच झाला आहे. पंचवटीतील चौक आणि रस्ते होर्डिंगने व्यापले आहे. त्यामुळे नागरिकांना, तसेच व्यावसायिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मखमलाबाद, म्हसरूळ, नांदूर नाका, आडगाव, पंचवटी कारंजा, आडगाव नाका, काळाराम मंदिर परिसर, रामतीर्थ आदी परिसरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावण्यात आले आहेत. होर्डिंग लावण्यासाठी नियमावली असताना तिचे पालन केले जात नाही. महानगर पालिकेच्या परवानगीशिवाय अनेक होर्डिंग लावण्यात येत आहेत. महानगर पालिकेची यंत्रणाही त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याला कुणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या मेहरबानीमुळे कारवाई होणार नाही, अशी कार्यकर्त्यांची खात्री झाल्याने अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढतच आहे.
नाशिक महानगर पालिकेने अधिकृत होर्डिंग लावण्यासाठी शहरातील विविध भागात अधिकृत जागा दिल्या आहेत, असे असतानाही शहरातील अनेक भागात, चौका-चौकात अनधिकृत होर्डिंग लावण्यात येत आहेत. वाढदिवस, जयंती उत्सव, उद्घाटन, क्लासेस यांसह काही ना काही कारणासाठी होर्डिंग लावणे ही एक फॅशन झाली आहे. या अनधिकृत होर्डिंगमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अनेक ठिकाणी व्यावसायिकांच्या दुकानांसमोर होर्डिंग लावले जात आहेत. जर कोणी अशा होर्डिंगला विरोध केला तर त्याला नंतर त्रास दिला जातो.
महानगरपालिका हद्दीत कुठल्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे होर्डिंग लावायचे असल्यास प्रत्येक विभागीय कार्यालयात ‘जाहिरात परवाना विभाग’ (एमटीएस) कार्यरत आहे. याच विभागाकडून सर्व प्रकारच्या होर्डिंग लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असून, त्यानंतर होर्डिंग लावले जातात. मात्र, फार थोड्या प्रमाणात होर्डिंगसाठी परवानग्या घेतल्या जात आहेत. अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई करून हे प्रकार थांबविण्यात याव्ोत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.