फैजपूर : प्रतिनिधी
येथील वीज पुरवठा वारंवार खंडीत होणे आणि नगरपरिषदेचा शहरातील पाणीपुरवठा रोजच विस्कळीत होत असल्याने शहरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या संदर्भात आ. शिरीष चौधरी यांनी तात्काळ सावदा येथील वीज मंडळाच्या कार्यालयात बैठक घेतली. बैठकीला धनंजय चौधरी, केतन किरंगे, पत्रकार अरुण होले, वीज मंडळाचे फैजपूर येथील उप अभियंता सरोदे, फैजपूर विभागाचे पाटील, लोहारा वीज केंद्राचे अधिकारी उपस्थित होते. यापुढे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठ्यावर आणि आसाराम नगर फिडरवर परिणाम होऊ देणार नाही, असे आश्वासन वीज मंडळाचे सपकाळे यांनी दिले.
फैजपूर शहरातील आसाराम नगर फिडरवर गेल्या ४ महिन्यांपासून दररोज वीज पुरवठा दिवसातून किमान ४ वेळा खंडित होत होता. त्यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच विजेवर कामे करणारे उद्योगधंदे मजूर वर्गावर परिणाम होत होता. फैजपूर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागावरही लोहारा येथे पाणी उचल व फैजपूर फिल्टर प्लांट या दोन्ही ठिकाणी वारंवार वीज पुरवठा बंद होत असल्याने परिणाम होत होता. दोन्ही कामांसाठी माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे यांनी आ. शिरीष चौधरी यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी वीज मंडळाचे गोरक्षनाथ सपकाळे यांची बैठक घेऊन मार्ग काढायला सांगितले.