पिंप्राळ्यात शिवरायांच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत

0
45

साईमत, प्रतिनिधी, जळगाव

पिंप्राळा येथे बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मंगळवारी दिवसभरात ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टीकरून पूजन केले. बँन्ड व डि. जेच्या तालावर वराड फाट्यापासून ते पिंप्राळ्यापर्यंत शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी 12 वाजेपासून मिरवणुकीला सुरुवात झाली असून रात्री 9 वाजेला पुतळा पिंप्राळ्यात दाखल झाला होता.

वराड फाट्या जवळील श्री राम फ्रुटर्सच्या गोडावूनपासून मंगळवारी दुपारी 12 वाजता शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील व श्री राम फ्रुटर्सचे मालक अविनाश काबरा यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. त्यानंतर पाळधी येथील साईबाबा मंदिरासमोर पाळधी ग्रामस्थांकडून शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तेथून पुढे आल्यानंतर जैन उद्योग समुहातर्फे स्वागत करण्यात आले असून शिवभक्तांसाठी चहा नास्त्याची व्यवस्था देखील तेथे करण्यात आली होती. त्यानंतर बांभोरी ग्रामस्थांकडून पुतळ्याचे स्वागत करण्यात आले. पुढे आल्यानंतर खोटे नगर, दादावाडी येथे देखील पुतळ्याचे जल्लोषात स्वागत झाले. पुतळा गुजराल पेट्रोल पंप व मानराज पार्क दरम्यान पोहचल्यानंतर माजी नगरसेवक अमर जैन यांच्याकडून पुतळ्याचे स्वागत व पूजन झाले असून शिवभक्तांना ज्युस वाटप करण्यात आले. त्यानंतर रात्री 9 वाजता शिवरायांचा पुतळा पिंप्राळा येथील चौकात पोहचला होता. या मिरवणुकीत मोठ्या संख्येत शिवभक्तांनी सहभाग घेवून डिजेच्या तालावर ठेका धरला होता.

पालकमंत्र्यांनी धरला ठेका
वराड बु. फाट्यापासून निघालेल्या शिवरायांच्या मिरवणुकीत बँन्ड व डिजेच्या तालावर शिवभक्तांनी ठेका धरला होता. मिरवणुक हळूहळू पुढे पुढे सरकत होती. मिरवणुक पाळधी फाट्याजवळ आल्यानंतर जळगावकडून पाळधीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ताफा येत होता. यावेळी मिरवणूक पाहून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपला ताफा थांबवून शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले व उपस्थित शिवभक्तांसोबत डिजेच्या तालावर ठेका धरला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here