साईमत जळगाव प्रतिनिधी
पाडळसे (ता. यावल) येथे बेकायदेशीर सुरू असलेले अवैध दारू अड्डे कायमस्वरूपी बंद करावते, या मागणीसाठी सोमवारी दुपारी १ वाजता जनक्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
याबाबत जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या पाडळसे गावात बेकायदेशीर अवैध दारू अड्डे बेसुमारपणे चालू आहेत. या दारू अड्ड्यांमुळे गरीब कष्टकरी महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. वारंवार फैजपूर पोलिस स्टेशनला दारू अड्डे बंद करण्याबाबत तक्रारी केलेल्या आहेत. तरीसुद्धा सुमारे १५ ते २० दारूअड्डे सर्रासपणे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. गेल्या ८ दिवसांपूर्वी २७ वर्षांचा तुषार तावड़े नावाचा युवक विषारी दारू सेवन केल्याने मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करावी व दारू व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व सुरू असलेले दारू अड्डे कायमस्वरूपी दारू अड्डे बंद करण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी व अप्पर पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले.
याप्रसंगी हे निदर्शने जनक्रांती मोर्चाचे राज्य अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांचे नेतृत्वात करण्यात आले. यावेळी जनक्रांति मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तायडे, जिल्हाध्यक्ष साहेबराव वानखेडे, संग्राम कोळी, सूरज कोळी, तुषार भोई, किरण तायड़े, विशाल सपकाळे, सय्यद टकारी , मनोज पाटील आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.