पाचोऱ्यातील बाजारात कैऱ्या खरेदीसह फोडण्यासाठी गर्दी लोणच्यासाठी कैरी फोडण्याचा अनेकांना मिळाला रोजगार

0
16
पाचोऱ्यातील बाजारात कैऱ्या खरेदीसह फोडण्यासाठी गर्दी लोणच्यासाठी कैरी फोडण्याचा अनेकांना मिळाला रोजगार-saimat

साईमत पाचोरा प्रतिनिधी

येथे दर शनिवारी आठवडे बाजारात मोठा बाजार भरतो. गेल्या शनिवारी बाजारात कैऱ्या नागरिकांना पहायला मिळाल्या. पाऊस पडण्याच्या आधी घराघरात कैरीचे लोणचे केले जाते. तालुक्याचा सर्वात मोठा बाजार असल्याने बाजारात नागरिकांनी कैऱ्या खरेदीसह फोडण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे लोणच्यासाठी कैरी फोडण्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे.
कैऱ्या खरेदीसाठी सकाळीच गर्दी बाजार घाटावरून मोठ्या प्रमाणात कैऱ्या विक्रीसाठी आल्या होत्या.

त्यात नीलम, चपाटा, सरदार, गावठी या कैऱ्यांना मोठी मागणी होती. सरासरी ३६ ते ६० रुपये किलोप्रमाणे कैऱ्यांना भाव होता. छोट्या आकारातील कैरीला ३० ते ५० रुपये आणि गावठी कैरीला ३५ ते ६० रुपये असा भाव मिळाला होता. खेड्यासह शहरातील नागरिकांनी कैऱ्या घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पाऊस पडण्याच्या आधी लोणचे घातले म्हणजे ते वर्षभर टिकून राहते. त्यासाठीच शनिवारी कैऱ्या घेण्यासाठी नागरिकांसह महिलांनीही मोठी गर्दी केली होती.

बाजारात लोणचे मसाला उपलब्ध
लोणचे टाकण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध झाल्याने गावातील बाजारात जाण्याची गरज नाही. त्यातच कैऱ्याही चांगल्या आहेत. वेगवेगळ्या भागातील कैऱ्या आल्यामुळे नागरिकांना आवडीप्रमाणे निवड करता आली. बाजार लोणच्यासाठी मसाल्याच्या पदार्थांची दुकाने थाटलेली दिसत होती. तसेच लोणचे वर्षभर टिकून रहावे, यासाठी चीनी मातीच्या भांड्यातच ते ठेवावे लागते. त्यामुळेच व्यापाऱ्यांनी चीनी मातीच्या वेगवेगळ्या आकारातील बरण्याही घेत आहे.

लोणचे करण्याच्या आधी कैऱ्या सुळ्याने फोडाव्या लागतात. बहुतांश नागरिकांच्या घरात सुळा उपलब्ध नसतो. त्यामुळे बाजारात स्पेशल कैऱ्या फोडण्यासाठी गर्दी झाली होती. पाच रुपये किलोप्रमाणे ते कैऱ्या फोडून देत होते. यामुळे कैऱ्या फोडणाऱ्यांना नवीन रोजगार उपलब्ध झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here