साईमत जळगाव प्रतिनिधी
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मंगळवारी जळगाव येथे आले. य़ावेळी महापौर जयश्री महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाववासीयांच्या समस्यांच्या तक्रारींचे दहा कलमी पत्र दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आलेल्या पत्रात त्या म्हणाल्या की, काम करीत असताना, अनेक योजना शासन दरबारी प्रस्तावित आहेत. त्या प्रलंबित असल्यामुळे कामकाजात अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे या समस्यांच्या तक्रारी सोडवाव्यात. शहरात महापालिकेच्या 28व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे गाळेधारकांना सुविधा देण्यास अडचणी येत आहेत. त्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा. हुडको संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे सेंटलमेंट करून महापालिकेला कर्जमुक्त केले आहे. मात्र, घेतलेल्या कर्जापोटी 47 कोटी रुपये हमीदेय आहे. त्याबाबत शासनदरबारी पत्र दिले आहे.
शिवाय सेवाभरती नियमावली, अनुकंपा भरती, जळगाव(Jalgaon) विमानतळाचा प्रश्न, महापालिका कर्मचाऱ्यांच्या लेखापरीक्षणावरील आक्षेप काढणे, रोजंदारी कर्मचारी समायोजन करणे, महापालिकेत सनदी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करणे, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेमुळे बाधित झालेल्या आजूबाजूच्या परिसरात सुविधा पोचविणे, अमृत अभियानांतर्गत मलनि:स्सारण योजनेसाठी पंपिंग मशिनला वीजपुरवठा करणे आदी समस्यांबाबत विचार करून त्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी महापौर महाजन यांनी पत्रात केली आहे.